माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे माजी बंडखोर नेते यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदींना जनतेने माफी देऊ नये, २०१९च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे सरकार उलथून टाकावे, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे. गुजरातमधील शेतकऱ्यांच्या एका सभेत ते बोलत होते.

गुजरातमधील जुनागढ जिल्ह्यातील वनथाली येथे शेतकरी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत शेतकऱ्यांना संबोधित करताना सिन्हा म्हणाले, हे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. प्रत्येकजण दुःखी आहे, यामध्ये शेतकरी, तरुण, महिला आणि दलित समाजाचा समावेश आहे. सरकारकडून केवळ घोषणा दिल्या जात आहेत. यावर एकच उत्तर आहे ते म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीत या सरकारला उलथून टाकायचे.

सिन्हा म्हणाले, मला तुमची माफी मागायची आहे. कारण, २०१४ मध्ये सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी ज्यावेळी भाजपाकडून खोटी आश्वासने दिली जात होती त्यावेळी मी भाजपाचा सदस्य होतो. मात्र, आता या खोट्या आश्वासनांसाठी तुम्ही मोदींना माफ करु नये, त्यांना धडा शिकवावा असे मला वाटते. यावेळी भाजपामध्ये नाराज असलेले खासदार शत्रूघ्न सिन्हा देखील या सभेमध्ये सहभागी होते. शत्रूघ्न सिन्हा म्हणाले, मी कोणत्याही वैयक्तिक फायद्यासाठी राजकारणात आलेलो नाही. जर उद्या माझ्या पक्षाने मला निलंबित केलं तरी मी कुठलीही तक्रार करणार नाही. मी देशाच्या जनतेवर माझ्या पक्षापेक्षाही अधिक प्रेम करतो.

माजी अर्थ मंत्री यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल करताना म्हटले की, मोदी सरकारने देशातील सर्व महत्वाच्या संस्थांची वाट लावली आहे. त्यामुळे आता वेळा आली आहे की, लोकांनी या संस्थांवर होत असलेल्या सर्जिकल स्ट्राइकविरोधात उभं रहायला हवं. तर सरकारने आरबीआयला देखील निर्देश दिले असतील तर गव्हर्नर उर्जित पटेल यांनी तत्काळ राजीनामा द्यायला हवा.