उत्तर प्रदेशातील एका सेवानिवृत्त आयएएस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावरून माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी योगी आदित्यनाथ सरकारवर निशाणा साधला आहे. “जेव्हा सरकारांचा मृत्यू जवळ येतो, तेव्हा ते पत्रकार व बुद्धीजिवी लोकांवर गुन्हे दाखल करतात,” अशी टीका सिन्हा यांनी केली आहे.

उत्तर प्रदेशमधील सेवानिवृत्त आयएएस अधिकारी सूर्यप्रताप सिंह यांच्या विरोधात करोना चाचणीबद्दल ट्विट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूर्यप्रताप यांनी उत्तर प्रदेशात होत असलेल्या करोना चाचणीच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले होते. याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेवरून सोशल मीडियात चर्चा सुरू आहे. माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी यावर भूमिका मांडली आहे. सिन्हा यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. “जेव्हा गिधाडाचा मृत्यू जवळ येतो, तेव्हा ते उजेडाच्या दिशेने धावत सुटत. पण जेव्हा सरकारचा मृत्यू जवळ येतो, तेव्हा ते पत्रकार आणि बुद्धिजिवींवर गुन्हे दाखल करते. उदाहरणार्थ विनोद दुआ आणि सूर्य प्रताप सिंह,” असं यशवंत सिन्हा यांनी म्हटलं आहे.

सूर्य प्रताप सिंह यांनी एक ट्विट केलं होतं. ज्यात वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ अधिकाऱ्यांना करोना चाचण्या वेगानं का करत आहात, यावरून ओरडत असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्याचबरोबर पत्रकार विनोद दुआ यांच्यावरही एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.