भारतात बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी निधी उभारण्याचे काम करणाऱया संशयित व्यक्तीला गेल्या आठवड्यात अबुधाबीमध्ये अटक करण्यात आली आहे. त्याची ओळख पटवून त्याच्या प्रत्यार्पणासाठी देशातील सुरक्षा यंत्रणा प्रयत्नशील आहेत.
संबंधित संशयिताची ओळख अब्दुल वाहिद सिद्दीबापा अशी असल्याचे समजते. तो मुळचा कर्नाटकातील भटकळ या गावाच रहिवासी आहे. इंडियन मुजाहिदीनचे म्होरके रियाज आणि यासिन भटकळ यांचा तो नातेवाईक असल्याचे समजते. मुंबईत जुलै २००६ रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात त्याचप्रमाणे २००८ मधील दिल्लीतील आणि २०१० मधील बंगळुरूतील बॉम्बस्फोटात सिद्दीबापा याचा हात होता, असे सुरक्षायंत्रणांनी म्हटले आहे. त्यांच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीसही बजावण्यात आली होती.
सध्या देशातील सुरक्षायंत्रणा सिद्दीबापा यांची ओळख पटविण्याचे काम करीत असून, अबुधाबीतील सुरक्षायंत्रणांच्या त्या संपर्कात आहेत. एकदा संशयित व्यक्ती सिद्दीबापा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेचे अधिकारी तातडीने त्याला ताब्यात देण्याची मागणी करण्यासाठी अबुधाबीला रवाना होणार आहेत, असे केंद्रीय गृह मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.