सत्तारूढ संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात रान उठविण्याऱ्या भारतीय जनता पक्षाने लोकसभेसाठी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व खाण गैरव्यवहार प्रकरणातील दोषी बी.एस.येडियुरप्पा यांना उमेदवारी घोषीत केली आहे. भाजपने शनिवारी जाहीर केलेल्या ५२ उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत येडियुरप्पा यांना शिमोगो मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. यादीत कर्नाटकातील २० उमेदवार आहेत.
खनिज उत्खनन आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदावरून हटविण्यात आले होते.  विधानसभा निवडणुकीत  येडियुरप्पा यांनी नवा पक्ष काढला होता. त्यामुळे  भाजपचा दारूण पराभव झाला होता. अखेरीस नरेंद्र मोदी यांच्या मध्यस्थीमुळे येडियुराप्पा यांचा भाजपमध्ये पुनर्प्रवेश झाला.
लालकृष्ण अडवाणींचे निकटवर्तीय अनंत कुमार यांना बंगळुरू दक्षिणमधून उमेदवारी देण्यात आली आहे. ज्येष्ठ पत्रकार व राज्यसभा सदस्य चंदन मित्रा यांना पश्चिम बंगालच्या हूग्ली मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. आसाममधून पाच, केरळमधून ३ , ओरिसातून ५ , त्रिपूरातून दोन तर पश्चिम बंगालमधून सतरा उमेदवारांची नावे भाजपने घोषीत केली. भाजपची सलग दुसरी यादी प्रसिद्ध झालेली असताना काँग्रेसमध्ये अद्याप संभाव्य उमेदवारांच्या नावाची चाचपणी सुरु आहे. महाराष्ट्रातून पहिल्या टप्प्यात लातूर. वर्धा, नागपूर, पुणे वगळता उर्वरित जागांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा येत्या आठवडय़ात होईल.