कर्नाटकमधील भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी शुक्रवारी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची नियुक्ती करण्यात आली. चौथ्यांदा येडियुरप्पा पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.
२०१२ मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे येडियुरप्पा यांना पक्षाने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर त्यांनी पक्षालाच रामराम ठोकला होता. २०१३ मध्ये नरेंद्र मोदी यांनी भाजपचे प्रचारप्रमुखपद स्वीकारल्यानंतर येडियुरप्पा यांनी पुन्हा एकदा पक्षात प्रवेश केला. त्यावेळी त्यांना पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्षपद देण्यात आले होते. येडियुरप्पा यांना पहिल्यापासून राष्ट्रीय राजकारणापेक्षा राज्यातील राजकारणात जास्त रस आहे. त्यामुळेच त्यांच्याकडे पुन्हा एकदा कर्नाटकच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सध्याचे अध्यक्ष प्रल्हाद जोशी यांचा कार्यकाळ गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्येच संपुष्टात आला होता. पण पर्यायी उमेदवाराच्या शोधात जोशी यांना आतापर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.