येडियुरप्पा मुख्यमंत्रिपदी; बहुमत सिद्ध करण्यास बुधवापर्यंत मुदत

बंगळुरू : कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. ए. येडियुरप्पा यांनी शुक्रवारी चौथ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या राजकीय नाटय़ावर पडदा पडला असला तरी येडियुरप्पांसमोर ३१ जुलैपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान आहे.

कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना राज भवन येथे झालेल्या समारंभात मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. शुक्रवारी केवळ येडियुरप्पा यांनीच शपथ घेतली.

राज्याचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी विधानसभेत मांडलेला विश्वासदर्शक ठराव ९९ विरुद्ध १०५ मतांनी फेटाळण्यात आल्यानंतर कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएस आघाडीचे सरकार कोसळले आणि त्यानंतर तीन दिवसांनी येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सत्तारूढ झाले आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी मी दूरध्वनीवरून चर्चा केली तेव्हा शहा यांनी शुक्रवारीच शपथविधीसाठी तयार राहण्याची सूचना आपल्याला केली, असे येडियुरप्पा म्हणाले, तसेच मंत्रिमंडळामध्ये कोणाचा समावेश करावयाचा याचा निर्णय शहा यांच्याशी चर्चा केल्यानंतरच घेण्यात येईल, असे येडियुरप्पा म्हणाले. कर्नाटकमधील यापूर्वीच्या काँग्रेस-जेडीएस आघाडीच्या १५ आमदारांनी बंड पुकारल्यानंतर मंगळवारी आघाडी सरकार कोसळले.

येडियुरप्पा यांचे वय ७६ आहे, भाजपने कोणतेही सरकारी पद भूषविण्यासाठी वयोमर्यादा निश्चित केली आहे, या बाबत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना विचारले असता ते म्हणाले की, येडियुरप्पा हे कर्नाटक भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत त्यामुळे त्यांनाच मुख्यमंत्रिपदासाठी पसंती देणे नैसर्गिक आहे.

तारेवरची कसरत..

विधानसभेत बहुमत सिद्ध करणे, बंडखोर आमदारांचे राजीनामे आणि त्यांची अपात्रता यामुळे होणारी पोटनिवडणूक जिंकणे आणि मंत्रिमंडळाची स्थापना करताना स्वपक्षीय नाराज होणार नाहीत याची काळजी घेण्याबरोबरच काँग्रेस-जेडीएसच्या बंडखोर आमदारांना सामावून घेणे या बाबत येडियुरप्पा यांना कसरत करावी लागणार आहे, असे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

घडामोडींना वेग..

कर्नाटकमध्ये शुक्रवारी सकाळी राजकीय घडामोडींना वेग आला. काँग्रेस-जेडीएसच्या तीन आमदारांना विधानसभेचे अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांनी गुरुवारी अपात्र घोषित केले. त्यानंतर शुक्रवारीच येडियुरप्पा यांनी वजुभाई वाला यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला आणि शुक्रवारीच शपथविधी व्हावा असा आग्रह धरला. त्यानंतर वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रित केले.