कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएसचे सरकार भाजप अस्थिर करणार नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले. भाजपकडून आमदारांची शिकार केली जाईल या भीतीने काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना येथून जवळच असलेल्या एका रिसॉर्टवर नेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी येडियुरप्पा यांनी वरील बाब स्पष्ट केली आहे.

गुरगावमधील एका हॉटेलमध्ये असलेल्या भाजपच्या सर्व आमदारांना राज्यात परतण्यास सांगण्यात आले असून हे आमदार आता राज्यातील दुष्काळी भागांचा दौरा करणार आहेत, असेही येडियुरप्पा म्हणाले. सर्व आमदारांना बंगळूरुला येण्याचे आदेश दिले असून ते परतण्यास निघाले आहेत, असेही ते म्हणाले. दुष्काळामुळे जनता त्रस्त असल्याने दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करून जनतेला भेडसावणाऱ्या समस्या सोडविणे हे आता आमचे काम आहे. कोणत्याही कारणास्तव आम्ही हे सरकार अस्थिर करणार नाही, त्यांनी काळजी करू नये, असे ते म्हणाले.

‘काँग्रेस-जेडीएस आघाडीत ज्वालामुखीचा उद्रेक’

काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला चार आमदारांची गैरहजेरी आणि सत्तारूढ काँग्रेस-जेडीएस आघाडीमध्ये असलेले तीव्र मतभेद हे आगामी दिवसांमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक होण्याचे संकेत आहेत, असे कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी म्हटले आहे. भाजपने कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएस सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू केल्याच्या पाश्र्वभूमीवर पक्षाची ताकद दाखविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला काँग्रेसच्या चार आमदारांनी हजेरी लावली नाही, त्यानंतर येडियुरप्पा यांनी वरील मत व्यक्त केले आहे.