अटकेतील युवकांबाबत सूचना

हसन जिल्ह्य़ातील एका हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या काही हिंदूू युवकांचा छळ करू नका, अशा सूचना कर्नाटक भाजपचे अध्यक्ष येड्डियुरप्पा पोलीस अधिकाऱ्यांना देत असल्याची चित्रफीत प्रसारित झाल्याने येडियुरप्पा वादात सापडले आहेत.

आपण यापूर्वीच १४-१५ हिंदू युवकांना अटक केली आहे, आणखी काही जणांचा छळ केला जात आहे, भविष्यात असे प्रकार करू नका, ते चांगले नाही, अरसिकेरेतील स्थिती बिघडेल, शांततेचा भंग होईल, असे येड्डियुरप्पा हसन जिल्हा पोलीस अधीक्षक राहुलकुमार शाहपूरवद यांना सांगत असतानाचे व्हिडीओ फुटेज प्रसारित करण्यात आले आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते ब्रिजेश कलप्पा यांनी हे व्हिडीओ फुटेज फेसबुकवर टाकले आहे. येड्डियुरप्पा हे या हत्या प्रकरणातील तपासावर दबाव टाकत असल्याचा आरोप कलप्पा यांनी केला. येड्डियुरप्पा गे पोलीस अधीक्षकांना धमकी देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. अरसिकेरे येथे एका २४ वर्षीय युवकाचा भोसकून खून करण्यात आल्यानंतर तेथे हिंसाचाराचा उद्रेक झाला होता. या खुनाचा व्हिडीओ प्रसारित झाला होता.