येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने नाराज झालेल्या काँग्रेसने भाजपावर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेसने येडियुरप्पा फक्त एका दिवसाचे मुख्यमंत्री असणार आहेत, कारण त्यांच्याकडे बहुमत नाहीये असं म्हटलं आहे. तसंच शुक्रवारी बहुमत सिद्ध करुन दाखवा असं आव्हानच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांना दिलं आहे.

काँग्रेसने राज्यपाल विजुभाई वाला यांच्यावरही टीका केली आहे. राज्यपालांनी दोनवेळा लोकशाहीचा अपमान केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. पहिल्यांदा जेव्हा त्यांनी भाजपाला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं आणि दुसऱ्यांदा जेव्हा त्यांनी येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी कर्नाटक प्रकरणी सुनावणी होणार आहे. न्यायालयाने येडियुरप्पा यांना राज्यपालांना पाठवलेली दोन पत्रं सादर करण्याचा आदेश दिला आहे.

काँग्रेस आणि जेडीएसने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत येडियुरप्पा यांच्या शपथविधीवर स्थगिती आणण्याची मागणी केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आणण्यास नकार दिला होता. गुरुवारी येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी राज्यपालांच्या निर्णयाविरोधात देशभरात धरणा आंदोलन करणार असल्याची माहिती दिली आहे. “येडियुरप्पा एक दिवसाचे मुख्यमंत्री ठरणार आहेत. न्यायालयाच्या निर्णयावर त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचं भविष्य ठरणार आहे”, असं त्यांनी म्हटलं आहे.

“भाजपाकडे संख्याबळ नसताना त्यांना सत्तास्थापनेसाठी आमंत्रण कसं काय दिलं जाऊ शकतं. राज्यपालांनी दोन वेळा लोकशाहीची हत्या केली आहे”, अशी टीका सुरजेवाला यांनी केली आहे. राज्यपाल भाजपा नेतृत्वासाठी काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.