येमेनची राजधानी सना येथे हवाई हल्ल्यात हॉटेलला लक्ष्य केल्याने ६० जणांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना बुधवारी घडली. सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील पथकाने हा हवाई हल्ला केल्याचे वृत्त आहे. हवाई हल्ल्याच्या वृत्ताला अद्याप सौदी अरेबियाने दुजोरा दिलेला नाही.

येमेनमध्ये इराणचा पाठिंबा असलेल्या हौथी बंडखोरांविरोधात सौदी अरेबिया आणि मित्र राष्ट्रांच्या सैन्याने युद्ध पुकारले आहे. येमेनची राजधानी सना प्रांतातील अरहब जिल्ह्यात सौदीने हवाई हल्ले केले. या हवाई हल्ल्यात बुधवारी हॉटेलला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात ६० जणांचा मृत्यू झाला. तर ५० हून अधिक जण जखमी झाले. या हल्ल्यात ७१ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले. मात्र या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळू शकलेला नाही.

येमेनमधील साना आणि उत्तर भागावर हौथी बंडखोरांचा कब्जा आहे. काही दिवसांपूर्वी येमेनमध्ये काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय समाजसेवी संस्थेने हवाई हल्ल्यांचे विदारक वास्तव मांडले होते. २०१७ या वर्षातील पहिल्या सहा महिन्यात येमेनमध्ये सर्वाधिक हवाई हल्ले झाले. २०१६ मध्ये वर्षभरात जेवढे हवाई हल्ले झाले तेवढेच हल्ले २०१७ मधील सुरुवातीच्या सहा महिन्यात झाले असे संस्थेने म्हटले होते. २०१७ च्या सहा महिन्यात ५, ६७६ हवाई हल्ले झाले. तर २०१६ मध्ये हेच प्रमाण ३, ९३६ होते. हवाई हल्ल्यांसाठी जबाबदार कोण याविषयी संस्थेने खुलासा केला नव्हता. मात्र मार्च २०१५ पासून येमेनमध्ये युद्ध सुरु आहे आणि तेव्हापासून येमेनच्या हवाई हद्दीवर सौदी अरेबियाचा ताबा आहे.

येमेनमध्ये संघर्ष का ?
येमेनमध्ये संघर्ष हा मुख्यत: शिया इराण आणि सुन्नी सौदी अरेबिया यांच्यातील आहे. हौथी बंडखोरांना इराणचा पाठिंबा आहे. हौथी बंडखोर हे झाईदी शिया असून ते सुन्नी विचारधारेविरोधात लढा देत आहेत. येमेनमध्ये हौथींचे वर्चस्व निर्माण झाल्यास सुन्नी सौदी अरेबियाला धोका निर्माण होईल. त्यामुळेच सौदी अरेबियाने पुढाकार घेऊन सुन्नी अरब राष्ट्रांना एकत्रित आणून येमेनवर हल्ले करायला सुरुवात केली.