येमेनच्या प्रश्नावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने बोलावलेल्या तातडीच्या बैठकीत १५ सदस्यांचे या वाढत्या समस्येबाबत तात्काळ निवेदन जारी करण्याबद्दल एकमत न होऊ शकल्यामुळे ही बैठक निष्फळ ठरली.
ही बैठक बोलावणाऱ्या रशियाच्या संयुक्त राष्ट्रसंघातील राजदूतांनी, येमेनला मदतीची गरज असल्याबाबत बोलणारे आपले सहकारी प्रत्यक्ष कृती का करू शकत नाहीत याबाबत आश्चर्य व्यक्त केले. येमेनमधील मूलभूत सेवा कोलमडून पडण्याच्या बेतात असल्याचा इशारा संयुक्त राष्टांच्या प्रमुखांनी दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रशियाचे राजदूत विताली चुर्किन यांनी ही बंदद्वार बैठक बोलावली होती.
सुरक्षेचे गंभीर प्रश्न
सौदी अरेबियाच्या नेतृत्वातील सुन्नी युतीने इराणसमर्थित शिया बंडखोरांविरुद्ध हवाई हल्ले सुरू ठेवल्यामुळे अरब जगतातील सगळ्यात गरीब देश असलेल्या येमेनमध्ये जे मानवतावादी आणि सुरक्षेचे प्रश्न निर्माण झाले आहेत, त्यावर चर्चा घडवून आणण्याची रशियाची इच्छा होती असे मुत्सद्दय़ांनी सांगितले.
सुरक्षा परिषदेच्या सदस्यांनी ज्याला पाठिंबा दिला नाही, ते चुर्किन यांचे प्रस्तावित निवेदन त्यांनी नंतर पत्रकारांना वाचून दाखवले. येमेनमध्ये तात्काळ युद्धबंदी लागू करावी, किंवा किमान मानवतेच्या दृष्टिकोनातून अधूनमधून हवाई हल्ले थांबवावे, असे या निवेदनात म्हटले होते.
येमेनमधील युद्ध तात्काळ थांबवण्याचे आवाहन सदस्य राष्ट्रांना करण्याची आपली इच्छा असल्याचे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान-की-मून यांनी शुक्रवारी म्हटले होते. तथापि, या संदर्भात आपल्या देशाच्या नेतृत्वाशी आपल्याला बोलावे लागेल, असा आग्रह काही सदस्यांनी धरला होता.