शिया बंडखोर आणि सरकार समर्थक सैनिक यांच्यात दक्षिण येमेनमध्ये झालेल्या भयंकर चकमकींमध्ये १२ जण मारले गेले. त्यामुळे या युद्धजर्जर देशाला दिलासा देण्यासाठी मानवीय दृष्टिकोनातून मांडला गेलेला युद्धबंदीचा प्रस्ताव प्रत्यक्षात न येण्याची शंका व्यक्त केली जात आहे.
सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील युतीने सहा आठवडय़ांहून अधिक काळ इराणची मदत असलेल्या बंडखोरांविरुद्ध जोरदार बाँबवर्षांव केला. त्यानंतर या युतीने पाच आठवडय़ांसाठी स्वत:हून जाहीर केलेल्या युद्धबंदीची मुदत शुक्रवारी उशिरा संपली. कुणी युद्धबंदीचे उल्लंघन केल्यास आपण ‘कारवाई करण्यास’ तयार असल्याचा इशारा सौदीने आधीच दिला होता.
ताज्या हिंसाचारात शियापंथीय हुथी बंडखोरांनी येमेनच्या ताएझ शहरावर केलेल्या गोळीबारात किमान १२ नागरिक ठार झाल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. रात्रभर चाललेल्या लढाईत माजी अध्यक्ष अली अब्दुल्ला सालेह यांच्याशी एकनिष्ठ असलेले २६ हुथी बंडखोर आणि सरकार समर्थक १४ सैनिक ठार झाल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिली.
मार्चपासून सुरू असलेल्या संघर्षांत आतापर्यंत दीड हजारांहून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत.