आंतरराष्ट्रीय पातळीवर काश्मीरच्या मुद्दय़ावरून भारत आणि पाकिस्तानात संघर्षांच्या ठिणग्या उडत असतानाच येमेनच्या रणभूमीवर मात्र उभय देशांत सदिच्छा आणि सौहार्द उमलले आहे. पाकिस्तानी नौदलाने ११ भारतीयांची सुखरूप सुटका करून कराचीमार्गे त्यांना खास विमानाने बुधवारी भारतात पाठविले आहे. भारताने या घटनेचे स्वागत करतानाच आम्हीही येमेनमधून पाकिस्तानी नागरिकांना सोडविल्याचे नमूद केले आहे.
पाकिस्तानी नौसैनिकांनी जीव धोक्यात घालून ही कामगिरी पार पाडल्याबद्दल आनंद व्यक्त करतानाच परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी भारतानेही ३२ देशांतील ४०९ नागरिकांची येमेनमधून सुटका केल्याची पुस्ती जोडली. यात पाकिस्तान, बांगला देश, नेपाळ आणि श्रीलंकेचे नागरिक आहेत.

भारतीय ओलीस?
येमेनमध्ये सहा बंडखोरांनी सलमान या भारतीयाला ओलीस ठेवल्याची फिर्याद त्याचे वडील अबदु रहमान यांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे केली आहे. ४९ वर्षीय सलमान हा केरळच्या मलाप्पुरमचा आहे. पत्नी व पाच मुलांसह गेल्या सात वर्षांपासून तो येमेनमध्ये राहात आहे. २४ मार्चला घरात घुसून सहाजणांनी त्याचे अपहरण केल्याचे त्याच्या पत्नीने सांगितले.

अकरा भारतीयांना सोडवण्यात पाकिस्तानने जी मदत केली त्याचे आम्ही स्वागत करतो. त्यांनी ही मानवतावादी सदिच्छा कृती केली आहे. मानवतेच्या सदिच्छेला देशांच्या सीमा नसतात. भारतानेही पाकिस्तान, बांगलादेश व मालदीव, म्यानमार, नेपाळ व श्रीलंका यांना येमेनमधील त्यांच्या नागरिकांना सोडवण्यास मदत केली आहे.  
– पंतप्रधान मोदी