येमेनमध्ये सौदी अरेबियाचे हल्ले सुरू असल्याने तेथील भारतीय नागरिकांची सुटका करण्यात येत आहे. बुधवारी ३५० भारतीयांची सुटका करण्यात आल्यानंतर गुरुवारी आणखी ३०० भारतीयांची सुखरूप सुटका करण्यात आली. या भारतीयांना हवाई दलाच्या विशेष विमानाने लवकरच भारतात आणण्यात आले.
सुटका झालेल्या या भारतीयांना एडन येथून आयएनएस सुमित्रा या जहाजाने आणण्यात आले आहे. या संघर्षमय देशातील भारतीयांची सुटका करण्यासाठी केंद्र सरकारने ‘ऑपरेशन राहत’ ही मोहीम आखली असून, त्यासाठी सागरी मार्गाचा अवलंब करण्यात येत आहे. भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग सध्या येमेनमध्ये दिजिबौती येथे असून, भारतीयांच्या सुटकेसाठी मदत केल्याबद्दल त्यांनी येमेनचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद अली युसूफ यांचे धन्यवाद मानले. सुटका झालेल्या भारतीयांना सी १७ ग्लोबमास्टर्स या हवाई दलाच्या विशेष विमानांनी भारतात आणण्यात येत आहे.