१९७५ मध्ये आणीबाणी लागू झाली त्यावेळी मी लहान होतो. माझ्या वडिलांना तुरुंगात जावे लागले. ही बाब माझ्या मनात घर करून राहिली होती, त्याचमुळे मी इंदिरा गांधी विद्यालयात जाणार नाही असा निश्चय केला. आईला सांगितले की ज्या इंदिराजींमुळे वडिलांना तुरुंगात जावे लागले त्यांचे नाव असलेल्या शाळेत मी जाणार नाही. ज्यानंतर मी ती शाळा सोडली, आईने सरस्वती विद्यालयात प्रवेश घेऊन दिला असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात त्यांनी ही भूमिका मांडली.

मोदी हटाव हे काँग्रेसचे एकमेव धोरण आहे. मात्र काँग्रेसचे हे स्वप्न मुंगेरीलालके हसीन सपने प्रमाणे भंग होणार आहे. काँग्रेसला देश, समाज यांच्याशी काहीही घेणेदेणे नाही ते फक्त मोदी हटाव एवढे एकच धोरण राबवत आहेत. मात्र त्यांचे हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या कार्यक्रमात त्यांनी अनेक प्रश्नांना रोखठोक उत्तरं दिली. तुम्ही आरएसएसचे लाडके आहात आणि ब्राह्मण आहात म्हणून तुम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी उत्तर दिले की मैदानात जाऊ लागलो तेव्हापासून संघात आहे. मी जातीच्या आधारे आणि लाडका असल्याने मुख्यमंत्री झालो नाही मी ज्याप्रकारे काँग्रेस-राष्ट्रवादीचा काळा कारभार जनतेसमोर आवडला ते लोकांना आवडले त्यामुळे लोकांनी मला निवडले असेही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

यावेळी जास्त आव्हान असेल का? यावर त्यांनी नाही असे म्हणत ब्राह्मण, मराठा असा भेदाभेद होणार नाही माझे काम पाहून लोक मला नक्कीच मत देतील असाही विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. अलाहाबादचे नाव प्रयागराज करण्यात आले यावर बोलताना त्यांनी प्रतिप्रश्न करत कलकत्त्याचे कोलकाता झालेले चालते, मद्रासचे चेन्नई झालेले चालते पण अलाहाबादचे नाव प्रयागराज केले की तुम्ही त्यात जातीयवाद शोधता ज्याची काही गरज नाही असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.