केंद्र सरकारने ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे अर्थव्यवस्थेत असलेल्या काळा पैसा आणि बेहिशेबी संपत्तीचे प्रमाण नक्की घटेल, असा विश्वास रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर सी. रंगराजन यांनी व्यक्त केला. ते एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत होते. यावेळी रंगराजन यांनी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयावर भाष्य केले. सरकारने हा निर्णय तडकाफडकी घेतल्यामुळे निश्चितपणे काही अडचणींना सामोरे जावे लागेल. मात्र, काही दिवसांतच या अडचणी दूर होतील. या परिस्थितीमुळे एक चांगली गोष्ट झाली आहे ती म्हणजे, लोक रोख रक्कमेशिवाय चलनाच्या अन्य पर्यायांचा विचार करू लागलेत. ही एक सुवर्णसंधी असून त्याचा फायदा उठवणे गरजेचे आहे, असे मत रंगराजन यांनी व्यक्त केले.

पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयाचे पडसाद जाणून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मध्यरात्री  वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली. पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरूण जेटली, माहिती व प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू, उर्जामंत्री पियुष गोयल आणि अर्थमंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याशिवाय, पंतप्रधानांनी देशभरातील बँका आणि पोस्ट कार्यालयांमध्ये किती प्रमाणात रोकड उपलब्ध आहे, याचाही आढावा घेतला. यावेळी रिझर्व्ह बँकेकडून पुरेशी रोकड उपलब्ध असल्याची माहिती पंतप्रधानांना देण्यात आल्याचे केंद्रीय अर्थसचिव शशिकांता दास यांनी सांगितले.

रकारकडून पाचशे आणि हजाराच्या नोटांवर बंदी घालण्याच्या निर्णयानंतर सध्या देशभरात निर्माण झालेल्या गोंधळ आणि जनक्षोभाच्या पार्श्वभूमीवर मोदींकडून या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून बँका आणि एटीएम केंद्राबाहेर लोकांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. चलनाच्या तुटवड्यामुळे लोकांना दैनंदिन व्यवहारातही मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या निर्णयामुळे द्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मोठ्याप्रमाणात टीका होत आहे. रविवारी देशभरात विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी बंदी घालण्याचे समर्थन करताना नागरिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. याच पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयाने आपल्या निर्णयात थोडासा बदल केला आहे. सरकारने पैसे काढण्याची मर्यादा वाढवून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.