चुकून चुका करण्यात अनुभवी झालेल्या केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गुरुवारी लोकसभेमध्ये निवेदन वाचून दाखवताना आणखी एक चूक केली. श्रीनगरमध्ये गुरुवारी सीआरपीएफच्या छावणीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंबंधी माहिती देणारे निवेदन शिंदे यांनी एकदा नाही, तर तब्बल दोन वेळा वाचले. लोकसभेतील अधिकाऱयाने शिंदे यांच्या जवळ जाऊन त्यांना त्यांची चूक लक्षात आणून दिल्यावर त्यांनी दुसऱयांदा वाचन करीत असलेले निवेदन अर्धवट गुंडाळले.
सीआरपीएफच्या छावणीवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा विषय विरोधकांनी गुरुवारी संसदेत उपस्थित केला. त्यावर लोकसभेत गृहमंत्र्यांनी निवेदन केले. एकूण पाच परिच्छेदांचे निवेदन एकदा वाचून झाल्यावर त्यांनी गोंधळात पुन्हा तेच निवेदन नव्याने वाचण्यास सुरूवात केली. आधीचेच निवेदन शिंदे पुन्हा वाचत असल्याचे लक्षात आल्यावर सत्ताधारी बाकांवरील सदस्य आश्चर्यचकित झाले. विरोधकांनी शिंदे पुन्हा तेच निवेदन वाचत असल्याचे लोकसभेच्या अध्यक्ष मीराकुमार यांच्या लक्षात आणून दिले. एवढं सगळं होत असतानाही शिंदे निवेदन वाचताना थांबले नाहीत. पाचपैकी तीन परिच्छेद त्यांनी पुन्हा वाचले. शेवटी मीराकुमार यांनी सूचना केल्यावर सभागृहातील अधिकाऱयांने शिंदे यांच्या जवळ जाऊन त्यांना त्यांची चूक लक्षात आणून दिली. त्यानंतर शिंदे यांनी निवेदनाचे वाचन थांबविले.
काही दिवसांपूर्वी राज्यसभेमध्ये एक निवेदन वाचताना शिंदे यांनी भंडारा बलात्कार प्रकरणातील तीन मुलींची नावेही वाचली होती. वास्तविक सर्वोच्च न्यायालयाने बलात्कार झालेल्या कोणत्याही व्यक्तीचे नाव जाहीर न करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावेळीही चूक लक्षात आल्यावर निवेदनात संबंधित मुलींची नावे कशी काय आली, याची चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन शिंदे यांनी दिले होती. त्यापूर्वी त्यांनी संसदेत दहशतवादी हाफीज सईद याचा उल्लेख श्री. हाफीज सईद असा केला होता. त्यावरही विरोधकांनी आक्षेप घेतला होता.