दररोज योगासन केल्यास फक्त तुमचे आरोग्यच चांगले राहते असे नव्हे तर तुम्ही देशाचे पंतप्रधान होण्याचीही मोठी शक्यता असते, हा अजब दावा केला आहे योगगुरू रामदेव बाबांनी. छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे ते बोलत होते. पंडित जवाहरलाल नेहरू आणि नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होण्यामागे योगासनांचे मोठे योगदान असल्याचे ते म्हणाले. योगासनाच्या माध्यमातूनच त्यांनी पंतप्रधानपदाची खुर्ची प्राप्त केल्याचे त्यांनी म्हटले.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हेही योगासनात आपली रूची दाखवतात, असेही रामदेव बाबा म्हणाले. राजकीय जीवनात व्यस्त राहणाऱ्या लोकांनी खासकरून योगासनाचा अभ्यास केला पाहिजे, असा सल्ला देत योगासनामुळे मानसिक तणाव कमी होतो असे त्यांनी म्हटले आहे.

‘टाइम्स नाऊ’च्या वृत्तानुसार, पतंजली समूहाच्या एका कपड्याच्या शोरूमचा शुभारंभ करण्यासाठी रामदेव बाबा रायपूर येथे आले होते. ते म्हणाले की, जे कोणी योगाभ्यास करतील त्यांना राजयोग प्राप्त होईल. जवाहरलाल नेहरू योगासन करत असत. त्यामुळे त्यांचा राजयोग चांगला होता आणि ते पंतप्रधान झाले. इंदिरा गांधीही योगाभ्यास करत असत. त्यांचाही राजयोग चांगला होता.

ते म्हणाले, मोदी पण योगासन करतात. त्यामुळे एक चहावाला देशाचा पंतप्रधान झाला. योगी आदित्यनाथ हेही योगासन करतात. त्यामुळेच ते देशातील सर्वांत मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री झाले. राहुल गांधीही योगासने करतात. याचा त्यांना लाभ होत आहे. सर्वच राजकीय नेत्यांनी योगाभ्यास केला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.