योगगुरू रामदेव बाबा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधींची स्तुती करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. राहुल आणि सोनिया गांधी या रोज योगासन करतात असे सांगत राहुल यांच्याशी माझी चांगली मैत्री असल्याचेही वक्तव्य त्यांनी केले आहे. आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या पार्श्वभूमीवर एका वृत्त वाहिन्यांसमोर त्यांनी हे वक्तव्य केले होते. विशेष म्हणजे रामदेव बाबा आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांची नुकतीच भेट झाली होती. या भेटीत रामदेव बाबांनी आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला समर्थन करण्याचा शब्द शाह यांना दिले आहे. त्यामुळे रामदेव बाबांच्या या वक्तव्याला चांगलेच महत्व आले आहे.

अमित शाह यांनी ‘संपर्क फॉर समर्थन’ या अभियानांतर्गत रामदेव बाबा यांची भेट घेतली होती. २०१४ साली भाजपाचे सरकार स्थापण्यासाठी ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिला होता. त्यांची आम्ही भेट घेत आहोत. त्यांच्यासमोर आम्ही सरकारच्या कार्य आणि उपलब्धीबद्दल माहिती देत आहोत. तसेच आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचा पाठिंबाही मागत असल्याचे शाह यांनी म्हटले होते.

रामदेव बाबांची भेट घेणे म्हणजे लाखो लोकांना भेटण्यासारखे आहे. त्यांनी आगामी निवडणुकीत आम्हाला पाठिंब्याबाबत आश्वस्त केले आहे, असेही शाह यांनी म्हटले होते.

रामदेव बाबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्व कौशल्याचेही मोठे कौतुक केले. ते म्हणाले, नरेंद्र मोदींचे नेतृत्व देशाला एका नव्या दिशेला घेऊन जात आहे. मागील चार वर्षांत केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या माध्यमातून आम्हाला अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे. जीएसटीमुळे सरकारने कररूपी दहशतवाद नष्ट केला आहे. एलपीजी कनेक्शन देऊन मोदींनी लाखो मातांच्या डोळ्यातील आसवे पुसली आहेत. सगळ्या जगातील नेत्यांकडून मान मिळवणारे मोदी हे मागील ७० वर्षांतील एकमेव शक्तिशाली भारतीय नेते आहेत.

विशेष म्हणजे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी रामदेव बाबांनी अनेकवेळा सोनिया गांधी आणि राहुल गांधींवर तिखट शब्दांत टीका केली होती. राहुल गांधी दलितांच्या घरी हनिमून करायला आणि सहलीला अवश्य जातात. पण कोणत्याही दलित मुलीशी लग्न ते करत नाहीत. जर त्यांनी एखाद्या दलित मुलीशी लग्न केले तर ते श्रीमंत होतील, त्यांचे भाग्य उजळेल, अशा प्रकारचे वक्तव्य केले होते. रामदेव बाबा हे पूर्वीपासून गांधी परिवारावर टीका करत आले आहेत. परंतु, अचानक राहुल आणि सोनिया गांधींचे कौतुक करून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.