स्वातंत्र्यानंतर एकाही संन्याशाला भारतरत्न न दिल्याबद्दल योगगुरू रामदेव बाबा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. त्यांनी पुढील सरकारला एका तरी संन्यासाला भारतरत्न देण्याचा आग्रह केला आहे. स्वातंत्र्यानंतर गेल्या ७० वर्षात एकाही संन्याशाला भारतरत्न न मिळावं हे दुर्भाग्य आहे. महर्षी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंदजी किंवा शिवकुमार स्वामीजी यापैकी एकास सरकारने पुढील वेळी भारतरत्न देऊन सन्मान करावा असे वक्तव्य योगगुरू बाबा रामदेव यांनी केले आहे.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न मिळाल्याबद्दल रामदेव बाबांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच, प्रवण मुखर्जी यांना भारतरत्न दिल्याबद्दल मोदी सरकारचे कौतुकही केले. २०१९ मधील निवडणुकीत काट्याची टक्कर होऊ शकते. कोणत्याही पक्षाला जाती आणि धर्माच्या बंधनात अडकवू नका. देशाला शैक्षणिक, आर्थिक, चिकित्सक आणि अन्य गुलामगिरीतून स्वतंत्र मिळावा यासाठी संकल्प करा, असेही ते म्हणाले.

दोनपेक्षा जास्त अपत्य असणाऱ्यांचा मतदानाचा अधिकार काढून घ्यावा, असा सल्ला याआधी योगगुरु रामदेवबाबा यांनी दिला होता. दोनपेक्षा जास्त अपत्य असणाऱ्यांना अन्य सरकारी योजनांसाठीही अपात्र ठरवावे, असेही त्यांनी म्हटले होते. गेल्या अनेक दिवसांपासून मी राजकारणाला आयुष्यातून डिलीट केले आहे. देशाच्या राजकारणात सध्या युद्ध सुरु आहे. दोन्ही बाजूंनी दिग्गज मैदानात उतरले आहेत. जय- पराजय हा कोणाचाही होऊ शकतो, पण ही निवडणूक रंगतदार असेल. राजकीय पक्षांनी देशाच्या विकासावरही भाष्य केले पाहिजे. पण दुर्दैवाने सध्या राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात व्यस्त असून राजकारणातील मर्यादांचा त्यांना विसर पडला आहे.