बऱ्या झालेल्या रुग्णांसाठी केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्त्वे

नवी दिल्ली : करोनामुक्त झाल्यानंतरही रुग्णांमध्ये शारीरिक थकवा, अंगदुखी, खोकला, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे कायम राहात असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने करोनोत्तर काळजीकरिता नवी मार्गदर्शक तत्त्वे रविवारी जाहीर केली. त्यामध्ये नियमित योगासने, प्राणायाम करणे याखेरीज च्यवनप्राशचे सेवन करणे यासारखे उपाय सुचवण्यात आले आहेत.

करोनाच्या गंभीर आजारातून बाहेर आलेल्या रुग्णांना पूर्णपणे बरे होण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो. त्यामुळे प्रकृतीकडे सातत्याने आणि बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे, अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली आहे. त्यामध्ये योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा करणे, प्रकृतीला झेपेल इतक्या वेगाने चालणे असे सल्ले देण्यात आले आहेत. याखेरीज गरम पाणी पिणे आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ‘आयुष’ औषधाचे सेवन करण्यासही सुचवण्यात आले आहे.

ही मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे, करोनासाठी प्रतिबंधात्मक उपाय नाही, असे सांगतानाच, रुग्णांनी आपल्या प्रकृतीकडे बारकाईने लक्ष ठेवावे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. रुग्णांनी रक्तातील ऑक्सिजनची मात्रा तपासणे, शरीराचे तापमान तपासणे, रक्तदाब व रक्तशर्करा यांची तपासणी करणे आवश्यक असल्याचे या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे.

बऱ्या झालेल्या रुग्णांनी आपले सकारात्मक अनुभव मित्रमंडळी तसेच नातलगांकडे व्यक्त करावेत, समाजमाध्यमांतून प्रसारित करावेत, असे आवाहनही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केले आहे.

देशातील रुग्णसंख्या ४७ लाखांवर

देशात रविवारी नव्या ९४ हजार ३७२ करोनाबाधितांची नांेद झाली असून एकूण रुग्णसंख्या ४७ लाख ५४ हजार ३५६वर पोहोचली आहे. गेल्या चोवीस तासांत देशभरात १११४ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा ७८ हजार ५८६ इतका झाला आहे. करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत ७८ हजार ३९९ ची भर पडल्यामुळे आतापर्यंत ३७ लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.