योगगुरू रामदेवबाबा यांना लंडनच्या हिथ्रो विमानतळावर अडवून ताब्यात घेतले गेले व त्यांचे अनेक तास जाबजबाब घेण्यात आले, पण त्यांना स्थानबद्ध करण्याचे कुठलेही कारण अधिकाऱ्यांनी दिलेले नाही. तसेच आपण कुठल्याही बेकायदा कृत्यात सामील नव्हतो, अशी प्रतिक्रिया योगगुरू रामदेव यांनी शनिवारी दिली.
 रामदेवबाबा हे स्वामी विवेकानंद यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त दोन दिवस होणाऱ्या पतंजली योगपीठाच्या कार्यक्रमासाठी लंडनला गेले आहेत.
ते म्हणाले की, आपल्या जीवनात आपण काहीच चुकीचे किंवा बेकायदा केलेले नाही. आपल्याला आठ तास विमानतळावर स्थानबद्ध केले होते, पण त्याचे कुठलेही स्पष्टीकरण करण्यात आले नाही. आपण त्यांना स्थानबद्धतेचे कारण विचारले, पण ‘ते सांगता येणार नाही,’ असे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले.
रामदेवबाबा यांना लंडनच्या हिथ्रो विमानतळावर डांबून ठेवल्याच्या प्रकरणी भाजपने केंद्र सरकारला हस्तक्षेपाची विनंती केली असून भाजप अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी योगगुरू रामदेवबाबा यांची स्थानबद्धता हा गंभीर प्रश्न असल्याचे म्हटले आहे.