योग गुरु बाबा रामदेव येत्या २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची तयारी करत आहेत. जे नियमित योगा करतात त्यांना ‘अच्छे दिन’ आले असा दावा बाबा रामदेव यांनी केला. योगाला लोकप्रिय केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले. त्याचवेळी त्यांनी गांधी कुटुंबालाही टोला लगावला.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी योगासने करत नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला असे बाबा रामदेव म्हणाले. पंतप्रधान मोदी सर्वांसमोर योगासने करतात. पंडित जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा गांधी लपून-छपून योगासने करायचे. पण त्यांच्या पुढच्या पिढीने म्हणजे राहुल गांधींनी योगासने केली नाहीत. त्यामुळे त्यांचे राजकारण गडबडले.

योग करणाऱ्यांना अच्छे दिन येतात असा दावा रामदेव यांनी केला. रामदेव यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल आज जे विधान केले ते वर्षभरापूर्वी त्यांनी केलेल्या विधानाच्या बिलकुल विरुद्ध आहे. राहुल आणि माझ्यामध्ये मैत्रीपूर्ण नाते असून राहुल आणि सोनिया गांधी नियमित योगा करतात असे रामदेव मागच्यावर्षी म्हणाले होते.