हिंदू, मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चन हे सगळे भारतवासीच आहेत.  जर कोणी हिंदुत्वच्या नावाखाली चुकीचे विधान करत असेल तर तो हिंदू नव्हे तर एखादा हैवान किंवा शैतान बोलत असेल अशा शब्दात योगगुरु बाबा रामदेव यांनी वाचाळवीर हिंदुत्ववादी नेत्यांना फटकारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील योगीच असून फक्त ते भगवे कपडे घालत नाही असेही ते म्हणालेत.

योगगुरु रामदेवबाबा यांनी ‘जनसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाजप, नरेंद्र मोदी, हिंदुत्व, राम मंदिर अशा विविध विषयांवर भाष्य केले आहे. आम आदमी विषयी विचारलेल्या प्रश्नावर रामदेवबाबा यांनी दिलेली सावध प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरली आहे. राजकारण ही एक कठीण प्रक्रीया आहे. आम आदमी पक्षाकडून मला आशा नाही. पण त्यांच्या कामावर मी निराशही नाही. देशाच्या गरजेनुसार अरविंद केजरीवाल हे परिपक्व होत असल्याचे मत रामदेवबाबा यांनी मांडले आहे. योगी आदित्यनाथांची मुख्यमंत्रीपदावर निवड करण्यात आली. याविषयी प्रश्न विचारले असता बाबा रामदेव म्हणाले, हे माझे स्वप्न होते. खरं तर देशाचे पंतप्रधान मोदीही योगीच आहेत. फक्त ते भगवे कपडे घालत नाही. आता मला योगाच्या आधारे अशी जादू निर्माण करायची आहे की या देशाचे पंतप्रधानांपासून ते खासदार, आमदार, डॉक्टर, मॅनेजर, न्यायपालिका अशा सर्व क्षेत्रात योगीच असतील असेही त्यांनी नमूद केले. यावर तुम्हाला हिंदूराष्ट्र निर्माण करायचा आहे का असा प्रश्नही रामदेवबाबांना विचारण्यात आला. पण त्यांनी हा दावा फेटाळून लावला. अध्यात्मिक जीवन, जागतिक पातळीवर अध्यात्मिक भारत आणि अध्यात्मिक विश्व घडवण्यासाठी हे प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणालेत.

वाचाळवीर हिंदुत्ववादी नेत्यांनाही रामदेवबाबा यांनी खडेबोल सुनावले आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन हे देवाचे पूत्र आहेत. आपली सर्वांची संस्कृती, सभ्यता एकच आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले. राम मंदिर हा राजकीय मुद्दा नाही. तर देशाच्या अस्मितेचा प्रश्न असल्याचा दावाही त्यांनी केला.

राजकारणात येण्याच्या चर्चेलाही त्यांनी फेटाळून लावले. मी कधीच राजकारणात येणार नाही. पण जेव्हा माझ्या देशावर कोणतेही संकट येईल तेव्हा मी माझे राष्ट्र धर्माचे कर्तव्य निभावणार असे ते म्हणालेत. काळा पैश्याविरोधात नरेंद्र मोदींकडून अजूनही आशा असल्याचे बाबा रामदेव यांनी सांगितले. काळ्या पैशावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण स्वच्छ आहे. लवकरच सगळं नीट होईल अशी आशा असल्याचे त्यांनी नमूद केले. मोदी सरकार भ्रष्टाचारावरही आळा घालण्यात यशस्वी होणार असा दावाही त्यांनी केला.