आंतरराष्ट्रीय योग दिवसानंतर केंद्र सरकारने निमलष्करी दलातील सुमारे दहा लाख जवानांना दररोज योगा करणे बंधनकारक केले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने गेल्या शुक्रवारी यासंबंधीचे आदेश जारी केले. त्याचबरोबर योगा केला जातो आहे की नाही, याचा अहवाल गृह मंत्रालयाकडे पाठविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
नक्षलवादग्रस्त भागांमध्ये त्याचबरोबर सीमारेषेवर लष्करी जवानांना मदतीसाठी नेमलेल्या निमलष्करी दलाच्या जवानांनाही रोजच्या रोज योगा करावा लागणार आहे. त्यांच्या दैनंदिन शारीरिक सरावाबरोबरच यापुढे त्यांना योगाही करावा लागेल, असे आदेशामध्ये म्हटले आहे.
केंद्रीय राखीव पोलीस दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, सीमा सुरक्षा दल, इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस, राष्ट्रीय सुरक्षा दल, आसाम रायफल्स आणि एसएसबी या सातही दलांच्या महासंचालकांना यासंदर्भातील पत्र गृह मंत्रालयाकडून पाठविण्यात आले. महासंचालकांनी जवानांचे शारीरिक सराव घेणाऱया अधिकाऱयांना यासंदर्भात माहिती द्यावी आणि योगा कशा पद्धतीने केला जातो आहे, याची माहिती गृह मंत्रालयाकडे पाठवावी, असे आदेशात म्हटले आहे.
रविवारी, २१ जून रोजी जगभरात पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी या दिवशी योगा करून योगसाधनेचे महत्त्व सांगितले.