आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यावरून मनिष सिसोदिया आणि योगेंद्र यादव यांच्यात ‘पत्रयुद्धा’ला जाहीर तोंड फुटल्याने ‘आप’मधील यादवी चव्हाटय़ावर आली आहे.
‘आप’चे एक नेते नवीन जयहिंद यांच्याबरोबरच्या वादात केजरीवाल यांनी आपली बाजू न घेतल्याने यादव दुखावले. त्यातून त्यांनी केजरीवाल हे हुकूमशाही प्रवृत्तीचे असल्याचा आरोप केला. त्या पत्राच्या ई-मेल उत्तरात सिसोदिया यांनीही यादव यांच्या चुकांचा पाढा वाचला. तुम्हाला लोकसभेची निवडणूक गुरगाँवमधून लढवू देण्यास पक्षात विरोध होता, हरयाणाचे भावी मुख्यमंत्री म्हणूनही तुमचे नाव प्रचारात आणण्यास विरोध होता. तरीही केजरीवाल यांनी नेत्यांचे मन वळविले. तेव्हा तुम्हाला ते हुकूमशाही वृत्तीचे वाटले नाहीत आताच का वाटतात, असा सवाल सिसोदिया यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर केजरीवाल यांना केवळ दिल्लीवरच लक्ष केंद्रित करायचे असताना त्यांना तुम्ही देशभर लढायला लावलेत, असा आरोप करीत पराभवाचे खापरही सिसोदिया यांनी यादव यांच्यावरच फोडले आहे.
‘बाहेर पडलेले’ एकत्र येणार
पक्षांतर्गत लोकशाही नसल्याचे कारण देत ‘आप’मधून बाहेर पडलेले वा काढलेले अनेक नेते व कार्यकर्ते गटागटाने एकत्र येण्याच्या विचारात आहेत. यामुळे आपसमोरील समस्यांत वाढ होणार आहे. अशा गटाचा पहिला कार्यक्रम १३ ते १५ जूनदरम्यान होणार असून विशेष म्हणजे त्यासाठी या मंडळींनी अण्णा हजारेंचे मार्गदर्शन घेतले आहे.