तमिळनाडूतील तिरुवन्नामलाई जिल्ह्यात रस्त्याच्या रुंदीकरणाविरुद्ध सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात भाग घेण्यासाठी निघालेले स्वराज पक्षाचे प्रमुख योगेंद्र यादव यांना शनिवारी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. यादव यांच्यासह अन्य 40 सहकाऱ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. अखेर रात्री उशीरा त्यांची सुटका करण्यात आली, त्यानंतर मध्यरात्री त्यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली. स्वतः योगेंद्र यादव यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे.


चेन्नई-सालेम हा द्रुतगती मार्ग आठ पदरी करण्यात येणार असून, या प्रकल्पामध्ये येथील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. येथील स्थानीक शेतकऱ्यांनी भूसंपादनास विरोध करीत आंदोलन सुरू केले आहे. या शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी यादव निघाले होते. मात्र, त्यांना शेतकऱ्यांना भेटू न देता पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप यादव यांनी केला. तर, यादव यांचे आरोप पोलिसांनी फेटाळले आहेत. यादव आणि त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांना पोसिस संरक्षणाची गरज होती. परिस्थिती तणावपूर्ण असल्याने तेथे स्थिती बिघडू शकते हे लक्षात घेऊन त्यांना अडविण्यात आले, असे पोलिसांनी म्हटले आहे.