हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना ठार झाले आहेत. पोलीस एन्काऊंटरमध्ये चारही आरोपी ठार झाले आहेत. अधिक तपासासाठी घटनास्थळी नेत असताना त्यांनी पोलिसांनी बंदूक हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. यावर आता सर्वच स्तरातून निरनिराळ्या प्रतिक्रिया येत आहे. यावर योगगुरू बाबा रामदेव यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. बलात्कारी आणि दहशतवाद्यांवर अशाच प्रकारची कारवाई झाली पाहिजे. ज्या घटनांबाबत साशंकता असेल त्याबाबतच न्यायालयात जायला हवे, असं म्हणत त्यांनी शुक्रवारच्या घटनेचं समर्थन केलं.

अशाप्रकारचे अपराधी हे कलंक असतात. अशा लोकांमुळे संपूर्ण देश आणि धर्म, संस्कृती बदनाम होत असते. जे दुष्कृत्य करतात त्यांच्यासोबत आणि दशतवाद्यांविरोधात त्याच ठिकाणी पोलिसांना, सैन्याला आणि निमलष्करी दलाला अशीच कारवाई करायला हवी, असं परखड मत रामदेव बाबा यांनी व्यक्त केलं. ज्या घटनांबाबत काही साशंकता असेल त्या घटना न्यायालयापर्यंत नेल्या पाहिजेत. त्यावेळीच कायदेशीर प्रक्रियांचा अवलंब केला पाहिजे.

आणखी वाचा- #HyderabadEncounter: उत्तर प्रदेश, दिल्ली पोलिसांनी काही शिकायला हवं : मायावती

हैदराबाद पोलिसांची चंबळच्या डाकुंशी तुलना
मुळात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींच्या हातात बेड्या असतात. त्या असतानाही त्यांनी शस्त्र हिसकावून घेतली असं गृहित धरलं तरी हा गोळीबार योग्य नव्हता. झटपट न्याय मिळाल्यानंतर आनंद होणं स्वाभाविक आहे. पण तसा न्याय चंबळचे दरोडेखोरही द्यायचे. पण शेवटी ते दरोडेखोरच होते, असंही ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितलं.

चकमक करण्याची पद्धत चुकीची – अंजली दमानिया
या घटनेनंतर द्विधा मनस्थिती आहे. बलात्कारी ठार झाल्याचा आनंद आहे, परंतु कायदेशीर मार्गाने फाशी व्हायला पाहिजे होती. चकमक करण्याची पद्धत चुकीची आहे, असं मत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या.

नेमकं काय झालं ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना तपासासाठी घटनास्थळी नेण्यात आलं होतं. यावेळी आरोपींनी पोलिसांवर हल्ला करत तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. चौघांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार करत ठार केलं, अशी माहिती सायबरादाबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी दिली आहे.

काय आहे प्रकरण ?
तेलंगणची राजधानी असलेल्या हैदराबाद येथे महिला पशुवैद्यकावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्यानंतर हत्या आणि नंतर मृतदेह जाळून देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. यानंतर पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली होती. आरोपींची चौकशी केली असता अनेक धक्कादायक खुलासे केले होते.