लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या महाविजयानंतर मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने सलग दुसऱ्यांदा शपथ घेतली. त्यात २४ कॅबिनेट मंत्री, ९ स्वतंत्र कारभार सांभाळणारे राज्यमंत्री आणि २४ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. देश-विदेशातील एकूण ८००० लोक या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित होते. यादरम्यान योगगुरु रामदेव बाबांनी विरोधकांना टोला लगावत सल्ला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली असून आता विरोधकांना पुढील १० ते १५ वर्ष कपालभाती करण्याची गरज आहे असं रामदेव बाबांनी म्हटलं आहे.

‘निवडणूक निकालानंतर विरोधी पक्षांचे नेते तणावग्रस्त आहेत. त्यांना कदाचित पुढील १० ते १५ वर्ष कपालभाती करण्याची गरज आहे’, असा टोला रामदेव बाबांनी लगावला आहे. पुढे बोलताना त्यांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात भारताला आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक आव्हानांना सामोरं जाण्यास मदत मिळेल अशी आशा व्यक्त केली.

‘अमित शाह, पियुष गोयल आणि नितीन गडकरी यांच्यासहित ज्या खासदारांनी शपथ घेतली आहे ते लोकांच्या अपेक्षांवर खरे उतरतील. पुढील पाच वर्षात सर्वजण मेहनतीने काम करतील’, असाही विश्वास रामदेव बाबांनी व्यक्त केला आहे. ‘मला वाटंत पुढील १० ते १५ वर्षांसाठी विरोधी नेत्यांना कपालभाती आणि अनुलोम विलोम प्राणायम करण्याची खूप गरज आहे. यानंतर ते आपल्या तणावावर नियंत्रण आणू शकतात’, असं रामदेव बाबांनी म्हटलं आहे.