उत्तर प्रदेशच्या लोकसभा पोटनिवडणुकीत झालेला पराभव मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मान्य केला आहे. गोरखपूर आणि फुलपूर या दोन्ही जागांवर भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. आम्ही उत्तर प्रदेशच्या जनतेने दिलेला कौल मान्य करतो. विजयी उमेदवारांचे अभिनंदन. नागरिकांच्या इच्छेनुसार विजयी उमेदवार राज्याच्या विकासामध्ये योगदान देतील अशी अपेक्षा आहे असे योगी म्हणाले. हा निकाल आमच्यासाठी पूर्णपणे अनपेक्षित आहे. कुठे कमी पडलो त्याचा आढावा घेऊ.

बसपा आणि समाजवादी पार्टीचे एकत्र येणे ही राजकीय सौदेबाजी असून देशाच्या विकासाला बाधित करण्यासाठी ही सौदेबाजी झाली आहे. या आघाडीचा सामना करण्यासाठी आम्ही आमची रणनिती बनवू असे योगी म्हणाले. राजकीय सौदेबाजी, स्थानिक मुद्दे आणि अति आत्मविश्वास यामुळे आमचा पराभव झाला असे योगी म्हणाले. गोरखपूरमध्ये झालेला पराभव हा योगी आदित्यनाथांसाठी मोठा धक्का आहे.

गोरखपूर हा योगींचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. योगी राज्याचे मुख्यमंत्री होण्यापूर्वी ते गोरखपूरमधून खासदार होते. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि योगी आदित्यनाथ विधानसभेत आल्यामुळे या दोन जागांवर पोटनिवडणूक झाली. फुलपूरमध्ये समाजवादी पार्टीचा उमेदवार ५९ हजारपेक्षा जास्त मतांनी निवडून आले.