उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यापासून योगी आदित्यनाथ हे प्रथमच त्यांच्या लोकसभा मतदारसंघात म्हणजे गोरखपूरमध्ये आले. त्यांचे गोरखपूरमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. पूर्वांचल आणि इतर भागातून त्यांचे चाहते तसेच साधू या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले. गोरखपूरमध्ये महाराणा प्रताप कॉलेजमध्ये त्यांनी भाषण दिले.

यावेळी त्यांना सबका साथ सबका विकासचाच नारा दिला. कोणत्याही भेदभावाशिवाय आपण आपले सरकार चालवू अशी ग्वाही त्यांनी दिली. कुठल्याही व्यक्तीला त्याचे वय, जात, धर्म, लिंग या आधारावर भेदभावाची वागणूक मिळणार नाही असे त्यांनी म्हटले. ज्या प्रमाणे हज यात्रेला जाण्यासाठी अनुदान देण्यात येते त्याप्रमाणे कैलास मानसरोवर यात्रेसाठी १ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येईल असे ते म्हणाले. तसेच लखनौ, नोएडा किंवा गाजियाबाद या ठिकाणी कैलास मानसरोवर भवनची स्थापना केली जाईल असे ते म्हणाले.

पोलिसांनी अॅंटी रोमियो स्क्वॅड सुरू केल्यामुळे पोलिसांवर टीका होत आहे. काही ठिकाणी पती-पत्नी आणि मित्र-मैत्रिणींनाच लक्ष्य करण्यात आल्याची काही उदाहरणे समोर आल्याचे वृत्त आहे. त्यावर त्यांनी पोलिसांना खडे बोल सुनावले. अॅंटी रोमियो स्क्वॅडची जबाबदारी महिलांच्या संरक्षणाची असून लोकांना त्रास देण्याची नाही असे त्यांनी बजावले.  आपली सर्वात महत्त्वपूर्ण जबाबदारी या राज्याची कायदा आणि सुव्यवस्था नीट सांभाळणे आहे असे ते म्हणाले. सर्वांनी सहकार्य करुन या राज्यामध्ये शांतता नांदेल अशी वर्तणूक करावी असे त्यांनी म्हटले.