अतिमागास आणि अतिदलित समाजाच्या उन्नतीसाठी गरज भासल्यास आरक्षण दिले जाईल, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी विधानसभेत स्पष्ट केले.

गोरखपूर आणि फुलपूर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या पराभवानंतर आदित्यनाथ यांनी समावेशक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. ‘मागास आणि दलितांना समाजाच्या मुख्यधारेत आणण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी उत्तर प्रदेश सरकार प्रयत्नशील आहे. कोणताही भेदभाव न करता आम्ही रोजगार देऊ, असे आदित्यनाथ म्हणाले.

पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून मिळणाऱ्या नोकऱ्यांत लाच द्यावी लागे. ४० ते ६० लाख रुपये दिल्याशिवाय उमेदवाराची निवड होत नसे. आता मात्र लाचखोरीला आळा बसेल. अशा प्रकरणांची चौकशी केली जाईल, असे आदित्यनाथ यांनी सांगितले. पुढील तीन वर्षांत २० ते ३५ लाख तरुणांना रोजगार मिळेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.