उत्तर प्रदेशात दोन हिंदू पुजाऱ्यांची हत्या करण्यात आल्याने सध्या तणावाचं वातावरण आहे. औरेया जिल्ह्यात ही घटना घडली असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तपासासाठी पोलिसांना २४ तासांची मुदत दिली आहे. मंदिराच्या छतावर झोपले असताना पुजाऱ्यांवर हल्ला झाला होता. या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाला आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण असून गावकरी आंदोलन करत निषेध व्यक्त करत आहेत.

योगी आदित्यनाथ यांनी याप्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन केलं असून, शनिवारपर्यंत तपास पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे. पुजारी मंदिराच्या छतावर झोपले असताना रात्री त्यांच्यावर काही अज्ञातांनी हल्ला केला होता. त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते.

शेखरपूरा सतकाना ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या मिलिक आणि बिजौली गावादरम्यान असणाऱ्या शिवमंदिरात ही घटना घडली आहे. हा परिसर निर्मनुष्य असून घरांमध्ये खूप अंतर आहे. महंत कालिदास आणि सोनपाल अशी हत्या झालेल्या पुजाऱ्यांची नावे आहेत. गेल्या २०-२५ वर्षांपासून ते मंदिरात राहत होते. रविवारी रात्री महंत, सोनपाल आणि शेजारच्या गावातील एक पुजारी मंदिराच्या छतावर झोपले होते. रात्री काही अज्ञातांनी मंदिराची भिंत ओलांडत मंदिराच्या छतावर प्रवेश केला. यावेळी त्यांनी काठी आणि विटांच्या सहाय्याने तिघांना जबरदस्त मारहाण केली. पुजाऱ्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला, मात्र काही फायदा झाला नाही.

अखेर मध्यरात्री ३ वाजता गावकरी घटनास्थळी पोहोचले. मात्र कालिदास आणि सोपनाल यांचा मृत्यू झाला होता आणि महेंद्र मृत्यूशी झुंज देत होता. गावकऱ्यांनी तात्काळ पोलिसांना बोलावलं. पोलीस उशिरा आल्याने गावकरी संतापले आणि त्यांनी पोलिसांना मृतदेहांना हात लावण्यास नकार दिला. नंतर महेंद्र सिंह यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

पुजारी गावात गाईंच्या तस्करीविरोधात प्रचार करत असल्यानेच ही हत्या करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. हत्येविरोधात आंदोलनादरम्यान गावकऱ्यांनी हिंसा केल्याने पोलिसांना बळाचा वापर करावा लागला होता. दरम्यान सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.