उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाधानी आहे असे दिसून येते आहे. कारण योगी आदित्यनाथ हे हिंदुत्त्वाचा नाही तर राष्ट्रीयत्त्वाचा चेहरा आहेत असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हटले आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये रा.स्व. संघाची तीन दिवसीय अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचा समारोप शनिवारी झाला. याच कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह सुरेश भय्याजी जोशी यांनी या संदर्भातले वक्तव्य केले.’न्यूज १८’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

समारोप कार्यक्रमात संघाचे सरकार्यवाह सुरेश भय्याजी जोशी यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला, ‘मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ‘पोस्टर बॉय’ प्रमाणे समोर आणले जाते आहे. निवडणुकांचा प्रचार असो किंवा इतर कोणताही कार्यक्रम त्यात योगी आदित्यनाथ असतातच. आजही ते हिंदुत्त्वाचा चेहरा आहेत का?’ या प्रश्नावर सुरेश भय्याजी जोशी यांनी उत्तर दिले, ‘योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत, पूर्ण जबाबदारीने ते आपले म्हणणे मांडतात. त्याचमुळे ते हिंदुत्त्वाचा नाही तर राष्ट्रीयत्त्वाचा चेहरा आहेत.’ राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी राष्ट्रीयत्त्वाचा चेहराच महत्त्वाचा आहे. सत्तेवर असणाऱ्या व्यक्तीने जबाबदारीने भूमिका मांडली पाहिजे, नेमके हेच योगी आदित्यनाथ करत आहेत म्हणूनच ते राष्ट्रीयत्त्वाचा चेहरा आहेत असेही जोशी यांनी स्पष्ट केले.

काही दिवसांपूर्वीच केरळमध्ये झालेल्या भाजपच्या जनरक्षा यात्रेत योगी आदित्यनाथ यांनी सहभाग घेतला होता. तसेच गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते ३ दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. अमेठी येथील विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमातही योगी आदित्यनाथ यांची हजेरी होती. भाजपतर्फे योगी आदित्यनाथ यांना प्रत्येक कार्यक्रमात पुढे आणले जाते आहे. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांना राष्ट्रीयत्त्वाचा चेहरा आहेत असे म्हटले. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.