मुंबई दौऱ्यावर असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सिनेसृष्टीतील कलाकारांसह उद्योगपती आणि गुंतवणूकदारांच्याही भेटी गाठी घेतल्या. दौऱ्याच्या अखेरीस योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये जागतिक स्तरावरील फिल्म सिटी उभारण्याचीही घोषणा केली. यावेळी फिल्मसिटीच्या मुद्यावरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री योगी यांनी ठाकरे सरकारला राजकीय स्थैर्यावरून अप्रत्यक्ष टोला लगावला.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नोएडात उभारण्यात येणाऱ्या फिल्मसिटीसंदर्भात कलाकारांशी चर्चा केली. त्याचबरोबर गुंतवणुकदारांशी योगींनी संवाद साधला. दौऱ्याच्या अखेरीस झालेल्या पत्रकार परिषदेत योगींनी फिल्मसिटी व गुंतवणुकीच्या मुद्यावर भाष्य केलं. फिल्मसिटी मुंबईतून उत्तर प्रदेशात नेण्यावरून सुरू असलेल्या वादावर योगींना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना योगी म्हणाले,”कुणीही काहीही हिसकावून घेत नाही आहोत. हिसकावून घ्यायला ही काही पर्स नाही. मुंबईतील फिल्मसिटी मुंबईत काम करत राहणार. उत्तर प्रदेशातील फिल्मसिटी उत्तर प्रदेशात काम करणार आहे.”

“आम्ही कुणाच्याही गुंतवणुकीला आम्ही नकार दिलेला नाही. ना कुणाच्या विकासाला बाधा आणण्याचं काम करत आहोत. आमच्या सगळ्यांचा एकच उद्देश आहे की, भारताची अर्थव्यवस्था जगामध्ये एक मजबूत अर्थव्यवस्था म्हणून विकसित व्हावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक राज्य आपआपलं योगदान यामध्ये देत आहे. उत्तर प्रदेशही आपलं योगदान देत आहे. त्या दृष्टीनं उत्तर प्रदेश काम करत आहेत. गुंतवणुकदारांना आकर्षित केलं जात आहे. हे काही उचला आणि खा असं नाहीये. सरकारनं काही धोरण ठरवलेली आहेत. ती धोरणं बघून कोणताही गुंतवणूकदार गुंतवणुकीचा विचार करतो. त्यासाठी धोरण हवं असतं. त्यासाठी सुरक्षित वातावरण हवं असतं. त्यासाठी सरकारची नियतही साफ असावी लागते. सरकारचं स्थैर्यही महत्त्वाचं असतं. त्यामुळे गुंतवणुकीच्या संधी वाढतात,” असं योगी आदित्यनाथ म्हणाले.