गेल्या काही महिन्यांमध्ये कथित गोरक्षकांच्या उच्छादामुळे वातावरण ढवळून निघालेल्या उत्तर प्रदेशमध्ये यापुढे कायद्याची पायमल्ली खपवून घेतली जाणार नाही, अशा इशारा राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. लोकांनी गोरक्षेच्या नावाखाली कायदा हातात घेता कामा नये. जो कोणी कायदा हातात घेईल त्यांना सरकार सोडणार नाही, असे योगी आदित्यनाथ यांनी ठणकावून सांगितले.

एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या १०० दिवसांच्या कामगिरीचा आढावा घेताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. माझ्या मते सरकार स्वत:चे काम व्यवस्थितपणे करत आहे. त्यामुळे कुणीही कायदा हातात घेण्याची गरज नाही. राज्यातील कोणत्याही निष्पाप व्यक्तीवर कारवाई होणार नाही, याची हमी मी तुम्हाला देतो. मात्र, त्याचवेळी सरकार कोणत्याही माफिया किंवा गुन्हेगाराला सोडणार नाही, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले. यावेळी त्यांना उत्तर प्रदेशात कत्तलखान्यांवर सुरू असलेल्या कारवाईबद्दलही विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी म्हटले की, सरकार राष्ट्रीय हरित लवाद आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार काम करत आहे. त्यामुळे अनधिकृत कत्तलखाने वगळता कायद्याचे पालन करणाऱ्या एकाही कत्तलखान्याला धक्का लागणार नाही, असे आश्वासन योगी आदित्यनाथ यांनी दिले.

‘मारहाणीतून हत्या झाल्याची बातमी वाचून माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच साबरमती येथील भाषणात गोरक्षकांना खडे बोल सुनावले होते.  ‘गोरक्षणाच्या नावाखाली मनुष्यहत्या करणे मुळीच स्वीकारार्ह नसून, अशा रीतीने कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणालाही नाही’, अशा शब्दांत मोदी यांनी स्वयंघोषित गोरक्षकांना समज दिली. मात्र त्यांच्या बोलण्याचा काहीही परिणाम स्वयंघोषित गोरक्षकांवर झालेला नसल्याचे झारखंडमधील एका घटनेने काही तासांतच स्पष्ट झाले. झारखंडमधील रामगड जिल्ह्य़ात असगर अन्सारी या तरुणाची गोमांसाची वाहतूक करीत असल्याच्या संशयावरून जमावाने हत्या केली. असगर हा त्याच्या गाडीतून गोमांस नेत असल्याच्या संशयावरून बेभान जमावाने त्याला बेदम मारहाण केली. त्यात त्याचा अंत झाला. मात्र, लहान मुलांचे अपहरण व हत्येच्या प्रकरणात असगरवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. गोमांसाची तस्करी करणाऱ्या काहीजणांनी ही हत्या केली आहे, असे पोलिसांतील काही जणांचे म्हणणे आहे.

गोरक्षकांच्या झुंडी मोदींना घाबरत नाहीत- पी. चिदंबरम