उत्तर प्रदेशच्या कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांमध्ये भेदभाव न करण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. किरकोळ गुन्ह्य़ांप्रकरणी शिक्षा भोगणारे आणि कुख्यात डॉन यांना एकाच पद्धतीचे भोजन आणि वागणूक देण्यात यावी, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

राज्य सरकारच्या गृह, दक्षता आणि कारागृह विभागांचा आढावा घेण्यासाठी बुधवारी रात्री एक बैठक आयोजित करण्यात आली होती तेव्हा आदित्यनाथ यांनी वरील आदेश दिले. कारागृहातील काही कैद्यांना विशिष्ट वागणूक देण्यात येते, त्यांना भ्रमणध्वनीही वापरण्याची मुभा दिली जाते अशा स्वरूपाच्या तक्रारी यापूर्वी आल्या होत्या.

किरकोळ गुन्ह्य़ासाठी शिक्षा भोगत असलेले आणि कुख्यात डॉन यांना एकाच प्रकारचे भोजन द्यावे आणि कारागृहात भ्रमणध्वनीचा वापर करता येऊ नये यासाठी जॅमर लावावे, असे आदेश आदित्यनाथ यांनी दिले असल्याचे अधिकृत प्रवक्त्याने सांगितले. कुख्यात गुन्हेगारांबाबत सौम्यता दर्शवू नये आणि वैद्यकीय उपचारांच्या नावाखाली त्यांना गैरफायदा घेऊ देऊ नये, असा इशाराही आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. पोलीस दलातील सर्व विभागांमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराला परिणामकारक आळा घालावा आणि कोणत्या कर्मचाऱ्याचे गुन्हेगारांशी अथवा समाजकंटकाशी लागेबांधे आहेत ते तपासण्याचे आदेशही देण्यात आले असल्याचे प्रवक्त्याने सांगितले.

उत्तर प्रदेशात भ्रष्टाचारी नोकरशहांवर कुऱ्हाड

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या एका वरिष्ठ नोकरशहाच्या निवासस्थानी छापे घालून प्राप्तिकर विभागाने बुधवारी १० कोटी रुपयांहून अधिकची रोकड आणि सुमारे १० किलो सोने जप्त केले. सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचारविरोधी कारवाईचा भाग म्हणून प्राप्तिकर खात्याच्या कर्मचाऱ्यांनी नॉयडा प्राधिकरणाचा माजी विशेष कार्याधिकारी (ओएसडी) असलेल्या एका अधिकाऱ्याच्या किमान ४ ठिकाणांवर छापे घातले, असेही एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.