देशभरामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगण, मिझोरम आणि छत्तीसगडमधील विधानसभेच्या निवडणुकांची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर या पाचही राज्यांमधील निवडणुकांना वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. या सर्व राज्यांमध्ये राजकीय पक्षांनी दोरदार प्रचार सुरु केला असून सभा आणि भाषणांचा सपाटा लावला आहे. त्यातही काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोपप्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. अशाच एका सभेदरम्यान मध्यप्रदेशमधील धार येथे बोलताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. हे मंदिर असून मशीद नाही अशी आठवण पुजारी राहुल यांना करुन देत असल्याचे योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.

गुजरात निवडणुकींच्या वेळी राहुल गांधी यांना गुजरातमधील अनेक मंदिरांना भेटी दिल्या होत्या. याचीच आठवण करुन देत योगी आदित्यनाथांनी धार येथील एका सभेमध्ये राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. ‘गुजरातमध्ये राहुल गांधींनी अनेक मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतले. मात्र मंदिरात गेल्यानंतर ते दर्शन घेण्यासाठी जेव्हा गुडघ्यावर बसत असत तेव्हा पुजाऱ्यांना त्यांना हे मंदिर आहे मशीद नाही अशी आठवण करु द्यावी लागत होती’, असे योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.

एएनआयने यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. या ट्विटखाली अनेकांनी योगी यांचे हे वक्तव्य व्हॉट्सअप फॉर्वडेड मेसेजमधले असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी योगी यांनी विकासकामांसंदर्भात बोलावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

राहुल गांधींनी गुजरात निवडणुकांच्या काळात राज्यातील अनेक मंदिरांना भेट दिली होती. या मंदिरभेटींवरूनही नंतर काँग्रेस आणि भाजपामध्ये बरेच वाद झाले होते. योगी यांच्या या नव्या वक्तव्यामुळे आता पुन्हा पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा धार्मिक राजकारण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.