योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशातील एक वादग्रस्त व्यक्तिमत्व गणले जाते. त्यांच्या निवडीमुळे विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तर त्यांच्यावर टीका करणाऱ्यांची देखील संख्या खूप आहे.

आदित्यनाथ यांच्या निवडीवर सकारात्मक, नकारात्मक आणि विनोदी प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. आदित्यनाथ यांनी हिंदू वाहिनीच्या माध्यमातून आपला हिंदुत्ववादी कार्यक्रम पुढे नेला त्याची देखील आठवण काही ट्विटरकरांनी करुन दिली. टोकाच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे त्यांच्याविरोधात नेहमीच बोलले जाते.

काही जणांनी तर त्यांना भारतीय डोनाल्ड ट्रम्प असे म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प हे ज्या प्रमाणे मुस्लिमांचा द्वेष करतात त्याप्रमाणेच योगी आदित्यनाथ देखील करतात तेव्हा त्यांच्या दोघांमध्ये फार काही फरक नाही असे त्यांनी म्हटले आहे. तसेच नोटाबंदी नंतरचा हा सर्वात मोठा निर्णय असल्याचेही त्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यावर राम मंदिर बांधण्याच्या दिशेने पावले उचलली जातील अशी विश्वास काही लोकांनी व्यक्त केला आहे. आदित्यनाथ यांच्या निवडीमुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहे असे देखील काही पोस्टमधून वाचायला मिळाले आहे.  काही विनोदी पोस्ट देखील पडल्या आहेत. फास्ट अॅंड फ्युरिअसचा अभिनेता विन डिजल आणि योगी आदित्यनाथ यांच्यात किंचितसे साम्य आहे. त्याच गोष्टीचा आधार घेऊन काही जणांनी विन डिजलचा फोटो वापरुन आदित्यनाथ यांना शुभेच्छा दिल्या आहेत.