उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी राज्यातील भाजप सरकारच्या १०० दिवसांच्या कामगिरीचा अहवाल जनतेसमोर सादर केला. सरकारनं केलेल्या कामगिरीवर योगींनी समाधान व्यक्त केले. सरकारने पहिल्या १०० दिवसांत केलेल्या कामगिरीने मी समाधानी आहे, असे योगींनी सांगितले.

उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारला १०० दिवस पूर्ण झाले आहेत. या १०० दिवसांत सरकारने कोणकोणती कामे केली, याबाबतचा अहवाल योगी यांनी पत्रकार परिषदेत सादर केला. आतापर्यंतची सरकारची कामगिरी समाधानकारक आहे, असे ते म्हणाले. उत्तर प्रदेश सरकार दरवर्षी २४ जानेवारीला उत्तर प्रदेश दिवस म्हणून साजरा करणार आहे, अशी घोषणा योगींनी केली. जातीवाद, घराणेशाहीमुळे गेल्या १४ ते १५ वर्षांत उत्तर प्रदेश विकासाच्या बाबतीत मागे पडला होता. पण भाजप सरकार समाजातील सर्व वर्गांचा विकास करण्यासाठी काम करत आहे, असे त्यांनी सांगितले. राज्यातील महिला आता स्वतःला सुरक्षित समजू लागल्या आहेत, असंही ते म्हणाले.

राज्यातील सर्व गावांसाठी २४ तास वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी केंद्रातील मोदी सरकारकडे केली आहे, अशी माहितीही योगी यांनी दिली. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे २२ हजार कोटींचे कर्ज माफ करण्यात आले आहे. राज्य सरकारकडून याआधीच्या सरकारच्या तुलनेत पाच पट जादा दराने शेतकऱ्यांकडून गहू खरेदी करत आहे. शेतकऱ्यांचे संरक्षण करणे हे राज्य सरकारचे कर्तव्य असल्याचेही योगींनी सांगितले. यावेळी योगींनी भविष्यात राज्यात राबवण्यात येणाऱ्या योजनांबाबतही सांगितले. लोकांना घरे, रस्ते आणि स्वच्छतागृह अशा आवश्यक गरजांची पूर्ती करण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठीही सरकार प्रयत्नशील आहे, असेही योगी यांनी सांगितले.