पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही कमालीची लोकप्रियता आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यापासून त्यांनी एकामागून एक धडाकेबाज निर्णय घेत आपली प्रतिमा आणखी उंचावली आहे. पूर्वी संसदेत बोलताना दिसणारे योगी आदित्यनाथ आता राज्याचा कारभार ही तितक्याच तडफेने चालवताना दिसतात. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागेल असे कोणत्या राजकीय पंडितालाही वाटले नव्हते. परंतु, आता आदित्यनाथ यांचे वडील आनंदसिंह बिष्त मात्र एक मोठी भविष्यवाणी केली आहे. २०२४ मध्ये योगी आदित्यनाथ हे देशाचे पंतप्रधान होतील, असा विश्वास त्यांनी माध्यमांसमोर बोलून दाखवला आहे. आनंदसिंह यांच्या या भविष्यवाणीमुळे अनेक राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये माध्यम प्रतिनिधींसमोर बोलताना आनंदसिंह म्हणाले, जनता जनार्दन असते. जनतेचा आशीर्वाद मिळेल आणि योगी आदित्यनाथ हे २०२४ मध्ये भारताचे पंतप्रधान होतील.

आदित्यनाथ यांनी सत्तेवर येताच राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अवैध कत्तलखान्यावर कारवाई सुरू केली. राज्यातील प्रलंबित मेट्रो प्रकल्पांना त्यांनी वेग दिला. दरम्यान, त्यांनी स्थापन केलेल्या अँटी रोमिओ स्क्वॅडकडून महिला, मुलींची कुंचबणा होत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी गोंधळही घातला होता.

आदित्यनाथ यांच्या वडिलांनी ही भविष्यवाणी केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. आता यावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.