25 February 2021

News Flash

जिन्ना यांचं चित्र हटवण्यासाठी योगी आदित्यनाथांच्या संघटनेचा ४८ तासांचा अल्टिमेटम

मोहम्मद अली जिन्ना यांचं चित्र हटवण्यासाठी हिंदू युवा वाहिनीने अलिगढ मुस्लिम विद्यापीठाला ४८ तासांचा अल्टिमेटम दिला आहे

पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जिन्ना यांचं चित्र हटवण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची संघटना हिंदू युवा वाहिनीने अलिगढ मुस्लिम विद्यापीठाला ४८ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. जर दोन दिवसांत चित्र हटवलं नाही तर आम्ही जबरदस्तीने ते हटवू असा इशाराच संघटनेने दिला आहे. हिंदू युवा वाहिनीचे उपाध्यक्ष आदित्य पंडित यांनी हा अल्टिमेटम दिला आहे.

मोहम्मद अली जिन्ना यांचे छायाचित्र लावण्यावरून अलीगढचे भाजपा खासदार सतीश गौतम यांनी कुलगुरू तारिक मन्सूर यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे. गौतम यांनी मन्सूर यांना पत्र लिहिले आहे. जिन्नांचा फोटो लावण्याची तुमच्यावर का वेळ आली ? असा सवालही त्यांनी विचारला. भारताच्या विभाजनानंतर पाकिस्तानच्या संस्थापकाचे छायाचित्र लावण्यामागे काहीच औचित्य नाही. जर त्यांना खरंच कोणाचे छायाचित्र लावायचे असेल तर त्यांनी महापुरूष महेंद्रप्रताप सिंह यांचे छायाचित्र लावले पाहिजे. त्यांनीच विद्यापीठासाठी जमीन दान दिली होती, असे गौतम यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान विद्यापीठात जिनांचा फोटो १९३८ पासून म्हणजे भारताच्या फाळणी अगोदरपासून लावलेले आहे. संसदेकडून जर जिनांचे छायाचित्र हटवण्याबाबत काही सूचना आली तर त्याचे पालन केले जाईल असे विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष फैजल हसन याने म्हटलं आहे. विद्यापीठाचे प्रवक्ते शफी किडवाई यांनीही जिना यांच्या चित्राचे समर्थन केलं आहे. जिन्ना हे विद्यापीठाचे आजीवन सदस्य होते आणि युनिव्हर्सिटी कोर्टाचेही सदस्य होते. गेली अनेक दशके हे चित्र तेथे आहे. त्याला आजवर कोणी आक्षेप घेतला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसने मात्र भाजपा खासदाराने केलेली मागणी हे त्यांच्या राजकीय खेळीचा भाग असल्याची टीका केली आहे. मूळ मुद्यांपासून लोकांचं लक्ष हटवत त्यांचं ध्रुवीकरण करण्याचा हा भाजपाचा डाव असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्त्या सुश्मिता देव यांनी दिली आहे.

आरएसएस कार्यकर्ता आमीर रशीद याने कॅम्पसमध्ये शाखेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्याची परवानगी मागितल्याच्या एका आठवड्यानंतर हा वाद निर्माण झाला आहे. आमीर रशीद याने कुलगुरुंना त्यासंबंधी पत्रही लिहिलं होतं. मात्र विद्यापीठाने कॅम्पसमध्ये कोणत्याही राजकीय पक्ष किंवा शाखेला कार्यक्रम आयोजन करण्याची परवानगी नसल्याचं उत्तर देत नकार दिला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2018 11:55 am

Web Title: yogi adityanaths outfit hindu yuva vahini gives ultimate to amu to remove jinnahs poster
Next Stories
1 उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरातील ज्योतिर्लिंगावर मिनरल वॉटरच्या पाण्याने अभिषेक करा – सर्वोच्च न्यायालय
2 अब्रू वाचवण्यासाठी महिलेचा दुर्गावतार; नराधमाचे कापले गुप्तांग 
3 धक्कादायक! जगातील सर्वाधिक २० प्रदूषित शहरांपैकी १४ शहरं भारतातच
Just Now!
X