उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा औरंगजेबचा मुद्दा उचलला आहे. औरंगजेबने जबरदस्ती काश्मिरी पंडितांचं धर्मांतर केलं होतं, असं योगी म्हणाले. बुधवारी लखनऊमध्ये बंजारा समाजाच्या एका कार्यक्रमात योगी पोहोचले होते, त्यावेळी त्यांनी याबाबत भाष्य केलं. यावेळी बोलताना आदित्यनाथ यांनी, शिखांचे नववे धर्मगुरू गुरु तेग बहादुर यांनाही औरंगजेबने बंदी बनवलं होतं असा दावा केला.


जेव्हा औरंगजेबचा काश्मिरी पंडितांवर अत्याचार सुरू झाला , त्यावेळी काश्मिरी पंडितांचा एक गट शिखांचे नववे धर्मगुरू गुरु तेग बहादुर यांच्याकडे आला होता, आणि त्यावेळी त्यांनी जबरदस्तीने आमचं धर्मांतर केलं जात असल्याचं सांगितलं. धर्मांतरासाठी आमच्यावर दबाव टाकला जात आहे, आम्हाला अपमानीत केलं जातंय अशी आपबिती काश्मिरी पंडितांनी गुरू तेग बहादुर यांच्याकडे सांगितल्याचा दावा योगींनी केला.

त्यावेळी, औरंगजेबच्या दबावाला बळी पडण्याची गरज नाही, उलट त्याला सडेतोड उत्तर द्या की, जर आमचे गुरू तुझं म्हणणं स्वीकारण्यास तयार असतील तर आम्हीही ते मान्य करु, असं गुरू तेग बहादुर यांनी काश्मीरी पंडितांना सांगितलं.  त्यानंतर औरंगजेबने गुरु तेग बहादुर यांनाही बंदी बनवलं आणि त्यांच्यावर अत्याचार केले, पण तरीही गुरू तेग बहादुर यांनी आपला धर्म बदलला नाही, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.