उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही आठवडयांपूर्वी समाजवादी पार्टीच्या प्रमुखांची मुगल शासक औरंगजेब बरोबर तुलना केली होती. त्यानंतर आता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर तुलना केली आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीतील भाजपाचा विजय हे देशातील गद्दारांना चोख उत्तर असेल असेही ते पुढे म्हणाले.

लखनऊमध्ये कुर्मी आणि पटेल समाजाच्या मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी हे विधान केले. सर्जिकल स्ट्राईक आणि डोकलाम वादावर केंद्र सरकारची आंतरराष्ट्रीय विषयांवर ठोस भूमिका दिसून आली. सर्जिकल स्ट्राईकने पाकिस्तानला धडा शिकवला तर डोकलाम वादात चीनला माघार घ्यायला भाग पाडले असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेद्र मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे जिथे ज्या प्रकारची गरज आहे तिथे त्या प्रकारची रणनिती अवलंबली. काँग्रेसने पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रभक्तीचे धडे घेतले पाहिजेत असे योगी म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला त्यांच्यापुढे नतमस्तक होण्यास भाग पाडले होते असे योगी म्हणाले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी गरीबी हटावचा नारा दिला पण मोदी सरकारच्या योजनांमुळे आज फरक दिसतो असे योगी म्हणाले. पुढच्यावर्षी लोकसभा निवडणुकीत भाजपाचा विजय हा देशद्रोही आणि भारत विरोधी तत्वांना उत्तर असेल असे योगी म्हणाले.