उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने सामूहिक विवाह सोहळ्यांमध्ये लग्न करण्यासाठी तरुणांना आकर्षित करण्यासाठीच्या योजनेत बदल केले आहेत. नवीन योजनेनुसार आता सामूहिक विवाह सोहळ्यात बोहल्यावर चढणाऱ्या नववधूला तीन हजार रुपयांचा मोबाईल फोनही सरकारकडून देण्यात येईल. मोबाईल फोन शिवाय लग्न करणाऱ्या मुलीला ३५ हजार रुपये देण्यात येणार आहेत. सध्या ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत सुरु करण्यात येणार आहे.

योगी सरकारच्या या योजनेनुसार नववधूला २० हजार रुपये रोकड दिली जाईल. हे पैसे थेट त्या मुलीच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातील. तर कपडे, चांदीचे पैंजण, जोडवी आणि सात भांडी असे एकूण १० हजार रुपयांचे सामान या लग्नासाठी योजनेसाठी पात्र असलेल्या वधूंना देण्यात येईल. वाराणसीचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी आर. के. यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार गरजू लोकांच्या सामूहिक विवाहसोहळ्यासाठी नोंदणीचे काम लवकरच सुरु होईल. यासाठी प्रशासनाकडे एक कोटी ६६ लाख ६० हजार रुपयांचा निधी मिळाल्याचेही यादव यांनी सांगितले.

अर्जांची चाचपणी झाल्यानंतर लग्नाची तारीख ठरवली जाईल असे सांगतानाच मुलाकडील आणि मुलीकडील नातेवाईकांच्या जेवणाची सोय करण्यासाठी पाच हजार रुपये खर्च केले जातील अशी माहिती यादव यांनी दिली. उत्तर प्रदेशमध्ये सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यासाठी कमीत कमी दहा जोडप्यांनी नोंदणी करणे गरजेचे असते. सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून बनारस जिल्हा प्रशासनाने २० ते ३० जानेवारी दरम्यान १०० जोपड्यांची लग्ने लावून देण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले असल्याचेही यादव म्हणाले.