उत्तर प्रदेशातील फर्रुखाबादच्या राममनोहर लोहिया रूग्णालयात ऑक्सिजन आणि औषधांच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे मागील महिन्यात ४९ मुले दगावल्याची माहिती समोर आली आहे. यावरूनच आता काँग्रेसने भाजप आणि योगी सरकारवर निशाणा साधला आहे. योगी सरकारच्या काळात उत्तरप्रदेश हे रोगी राज्य झाले, अशी खरमरीत टीका काँग्रेसच्या उत्तर प्रदेश कमिटीचे अध्यक्ष राज बब्बर यांनी केली आहे.

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील बातमी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशात येऊन मोठ मोठी भाषणे दिली, उत्तर प्रदेशासाठी विविध घोषणा करण्यात आल्या. योगी आदित्यनाथ यांनीही अनेक आश्वासने दिली. मात्र नवजात बालकांची काळजी घेण्यात योगी आदित्यनाथ सरकार सपशेल अपयशी ठरले आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा दिला पाहिजे, त्यांनी तो दिला नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तो त्यांच्याकडून घेतला पाहिजे, अशीही मागणी राज बब्बर यांनी केली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मथुरेत यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात हजेरी लावायला वेळ आहे, मित्र आजारी झाला तर विमानाने त्याला भेटायला वेळ आहे, मात्र जी मुले दगावली त्यांच्या पालकांसाठी वेळ नाही. जनतेच्या वेदना जाणून घेण्यात योगी आदित्यनाथ यांना काहीही स्वारस्य नाही, अशीही टीका राज बब्बर यांनी केली.

उत्तर प्रदेश येथील गोरखपूरमधील बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने सुमारे ७० बालकांचा मृत्यू झाला होता. या मृत्यूंवरून योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका झाली होती. आता राममनोहर लोहिया रूग्णालयात २१ जुलै ते २० ऑगस्ट दरम्यान दर १४ तासाला एका नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे.

याप्रकरणी सीएमओ, सीएमएस आणि लोहिया रूग्णालयाच्या डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक दयानंद मिश्रा यांनी सांगितले आहे. महिन्याभरातील या दोन घटना समोर आल्याने आता काँग्रेसने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांवर टीकेचे बाण चालवले आहेत.

काँग्रेसचे दुसरे नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांनीही योगी आदित्यनाथ यांच्या कारभारावर टीका करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच या बालमृत्यूंना सरकार आणि प्रशासन यांचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचाही आरोप केला आहे. ज्या पालकांनी आपली मुले गमावली त्यांचे हृदय किती पिळवटून निघाले असेल, याची कल्पनाही करवत नाही. योगी आदित्यनाथ यांना मात्र या सगळ्यांशी काहीही घेणेदेणे नाही, असेही सुरजेवाला यांनी म्हटले आहे