आंबा म्हणजे सर्वांचे आवडते फळ आणि फळांचा राजा. उन्हाळ्याच्या सीझनमध्ये किती आंबा खाऊ आणि किती नको असेच अनेकांना होऊन जाते. विविध प्रकारच्या आंब्यांची प्रदर्शनेही ठिकठिकाणी लागतात. उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे आयोजित करण्यात आलेल्या आंबा महोत्सवात ७०० हून अधिक प्रकारचे आंबे विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नाव येथील आंब्याच्या एका प्रकाराला देण्यात आले आहे आणि हा ‘योगी आंबा’ प्रदर्शनाचे आकर्षण ठरला आहे. योगी आदित्यनाथ यांनीच या प्रदर्शनाचे उद्घाटन केले.

उत्तर प्रदेश हे सर्वाधिक आंबा उत्पादन करणारे राज्य आहे. याठिकाणी राज्यात ४०-४५ लाख मेट्रिक टन आंब्याचे उत्पादन होते. येथील आंबे देशात तसेच परदेशातही विक्रीसाठी पाठवले जातात. उत्तर प्रदेशातील लंगडा, दशेहरी, जौहरी, नीलम, आम्रपाली, गुलाब या आंब्यांच्या जाती विशेष प्रसिद्ध आहेत. सहारनपूर गावातील एका आंब्याला ‘योगी’ असे नाव देण्यात आले आहे. येथील एका आंबा उत्पादकाने आपल्या आंब्यांना हे नाव दिले. त्याच्या एका झाडाला ३०० वेगवेगळ्या जातीचे आंबे येतात. त्यांच्या या प्रयोगाबद्दल त्यांना ‘पद्मश्री’ तसेच राज्य सरकारचा ‘उद्यान पंडित’ हे किताब मिळाले आहेत.

शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यासाठी अशाप्रकारची कृषी प्रदर्शने हातभार लावतात, असे मत योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केले. आंब्याच्या उत्पादनात राज्यात अनेक प्रयोग होत असून मागच्या काही वर्षात हे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे असेही ते म्हणाले. मात्र राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात उत्पादित होणाऱ्या या फळाचे योग्य पद्धतीने मार्केटींग होत नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. प्रदर्शनात गुजरात, उत्तराखंड, मध्य प्रदेश अशा इतर राज्यातील आंबे विक्रेत्यांचेही स्टॉल आहेत. अशाप्रकारच्या प्रदर्शनांमुळे कृषी पर्यटनाला वाव मिळेल असेही योगी आदित्यनाथ म्हणाले.