लोकसभेत आज केंद्र सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला, त्यानंतर लोकसभेत याची सविस्तर चर्चा रंगली. सर्वपक्षीय खासदारांनी आपली आपली भूमिका मांडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलायला उभे राहिले. त्यावेळी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी सुरूच ठेवली. आम्ही काय काय विकासकामे केली? काँग्रेसने काय केले नाही? हे सगळे सांगत असताना विरोधकांनी we want justice आणि आश्वासने पूर्ण करा अशा घोषणा सुरूच ठेवल्या. या संपूर्ण गदारोळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आपली भूमिका मांडताना दिसले.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे करत विरोधी पक्षातल्या खासदारांनी देशाच्या विकासासाठी या सरकारने काहीही केलेले नाही याचा पाढा वाचला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल करार, महिला सुरक्षा, नोटाबंदी या विषयांवरून सरकारवर निशाणा साधला अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी बोलायला आणि या सगळ्या आरोपांना उत्तर द्यायला लोकसभेत उभे राहिले तेव्हा सगळ्याच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरूवात केली.

रोजगाराचा प्रश्न सोडवा, आश्वासने पूर्ण करा जनतेला न्याय द्या, या आणि अशा अनेक घोषणा सुरूच ठेवल्या. विरोधकांना उत्तर देताना पंतप्रधान म्हटले तुम्हाला मला जी काही नावे ठेवायची आहेत ती ठेवा मात्र देशाच्या जवानांना नावे ठेवू नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या सगळ्या आरोपांना उत्तर दिले. मात्र लोकसभेत विरोधकांच्या गोंधळातच त्यांना आपले म्हणणे मांडावे लागले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या डोळे मारण्यावरही उपरोधिक टीका केली. राहुल गांधी यांनी आज त्यांच्या डोळ्यांचा कसा खेळ केला हे देशाने पाहिले असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.