News Flash

तुम्ही माझं बालपण हिरावून घेतलं; जगभरातील नेत्यांवर ग्रेटा थनबर्ग संतापली

युएन हवामान कृती परिषद

युवा पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग.

हवामान बदल थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्रे संघात हवामान कृती परिषद सुरू आहे. या परिषदेला आलेल्या जगभरातील नेत्यांवर १६ वर्षीय पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने संताप व्यक्त केला. “पर्यावरण संवर्धनासंदर्भात तुमच्या पोकळ शब्दांनी माझं बालपण हिरावून घेतलं आहे,” असा आरोप ग्रेटा थनबर्गने केला आहे.

जागतिक तापमान वाढ आणि हवामानातील बदलाच्या संकटावर मात करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाची न्यूयॉर्क शहरात ‘युएन हवामान कृती परिषद’ आयोजित केली होती. या परिषदेला जगभरातील नेत्यांसह भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हजेरी लावली आहे. “जागतिक हवामान बदलाच्या संकटावर मात करायची असेल तर सध्या सुरू असलेले प्रयत्न तोकडे आहेत, हे आधी आपल्याला स्वीकारावे लागेल. तसेच चर्चा करण्याचे दिवस संपले असून आता कृती करण्याची गरज आहे,” असं मोदी या परिषदेत म्हणाले.

दरम्यान, परिषेदच्या सुरूवातीलाच स्विडिश युवा पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्गनेही या परिषदेत भूमिका मांडली. “हे सर्व चुकीच होत आहे. मी इथे थांबायला नकोय. समुद्राच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या शाळेत मी जायला हवं. तुमच्या पोकळ शब्दांतून तुम्ही माझी स्वप्न आणि माझ बालपण हिरावून घेतलं आहे. पण तरीही तुम्ही माझ्याकडे आशेने येतात. तुमची हिंमत कशी होते,” असा सवाल थनबर्गने युनोच्या व्यासपीठावरून जगभरातील नेत्यांना केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 8:09 am

Web Title: you have stolen my childhood greta thunberg slams world leaders bmh 90
Next Stories
1 अल कायदाला प्रशिक्षण पाकिस्तानातच; इम्रान खान यांची कबुली
2 भारताचे जीवाश्मरहित इंधनाचे लक्ष्य दुपटीहून अधिक!
3 चिन्मयानंद प्रकरणातील मुलीच्या अटकेला स्थगितीस नकार
Just Now!
X