केंद्र सरकारने कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेताना त्याचा नक्की कोणावर काय परिणाम झाला बाबत सोप्या शब्दांत काँग्रेसने आपली भुमिका मांडली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ते संजय झा यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. या ट्विटची सध्या सोशल मीडियात बरीच चर्चा सुरु आहे.

झा यांनी ट्विटमध्ये म्हटले की, “तुमच्याकडे ३ बीएचकेचं घर आहे, जे सध्या तुमच्याच मालकीच आहे. या घरामध्ये अचानक तुम्ही काही बदल करीत यातील एका बेडरुमचे विभाजन केले आणि त्याचे ४ बीएचकेमध्ये रुपांतर केले. या महत्वाच्या बदलामुळे या घराची जागा तेवढीच राहिली आणि यानंतरही हे घर तुमचच्याच मालकीचे आहे. मात्र, घरामध्ये असा बदल करीत असताना तुम्ही आपल्या कुटुंबियांची परवानगी न घेताच हे केल्याने या कृतीमुळे तुमचे कुटुंब आनंदी आहे का?”

या ट्विटच्या माध्यमांतून झा यांना असे सुचवाचे आहे की, भाजपाप्रणीत एनडीए सरकारने जम्मू-काश्मीरबाबतचे कलम ३७० हटवण्याआधी आणि त्याची पुनर्रचना करण्याआधी काश्मीरमधल्या दोन प्रमुख पक्षांना विचारातच घेतले नाही. काश्मीर यापूर्वी भारताचाच भाग होता आणि त्यात बदल केल्यानंतरही तो भारताचाच भाग म्हणून कायम आहे. मात्र, हे करीत असताना काश्मीरमधील जनतेला विचारात न घेतल्याने ते या निर्णायमुळे आनंदी आहेत का? हा प्रश्न कायम आहे.